कोल्हापूरच्या आखाड्यातून पंढरपूरच्या आमदारकीपर्यंत भालकेंचा प्रवास ! - Bhalke's journey from Kolhapur arena to Pandharpur MLA! | Politics Marathi News - Sarkarnama

कोल्हापूरच्या आखाड्यातून पंढरपूरच्या आमदारकीपर्यंत भालकेंचा प्रवास !

मतीन शेख 
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

कुस्तीचा आखाडा गाजवून गावी परतल्यानंतर ते राजकारणाच्या आखाड्यात उतरले. साखर कारखान्याचे संचालक ते सलग तीनवेळा आमदार होत त्यांनी हॅट्रीक साधली. विधानसभेत त्यांचा रांगडा आवाज गेली बारा वर्षे घुमत होता. राजकारणात असले तरी त्यांच कुस्ती प्रेम कायम होतं.

कोल्हापूर : तगडी शरीरयष्टी, काळी दाढी, अंगांवर पांढरा शुभ्र सदरा, विजार, डोक्यावर टोपी अन् याला जोड भारदस्त आवाजाची. हे जबरदस्त व्यक्तिमत्त्व पंढरपुर - मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे. काल ते काळाच्या पडद्याआड गेले. कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीत तयार झालेले भालके पंढपुरात आमदार झाले पण कोल्हापुरच्या तांबड्या मातीशी त्यांची नाळ कायम होती. त्यांच्या अचानक जाण्याने कुस्तीशौकींना मधुन हळहळ व्यक्त होत आहे.

पंढरपुर तालुक्यातील चंद्रभागा नदीकाठचं सरकोली हे भालके यांचं गाव. या गावाला कुस्तीचा वारसा. गावातल्या आखाड्यातच भालकेंनी कुस्तीचा श्रीगणेशा केला. वडील तुकाराम भालकेनां कुस्तीचा चांगला छंद. पोरगा चांगला पैलवान व्हावा ही त्यांची इच्छा. याच इच्छेखातर भारत यांना १९७५ ला कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमी कुस्तीच्या सरावासाठी पाठवलं अन् सुरु झाला त्यांचा कुस्तीचा प्रवास. वस्ताद महंम्मद हनिफ यांच्या मार्गदर्शनाखाली ते कुस्तीचे धडे गिरवु लागले.
 
शाहूपुरी तालमीत भारत भालकेंचा जोर - बैठकांचा पारा वाढत होता. शरीर कसदार बनत होतं. कुस्तीचं तंत्र लवकरच त्यांनी आत्मसात केलं. कोल्हापूर नजीकच्या कुस्ती स्पर्धा तसेच खासगाबच्या फडात उतरत त्यांनी चांगल्या कुस्त्या मारल्या .भालके यांची गावाकडील आर्थिक परिस्थिती चांगली होती. स्वभाव कडक असला तरी ते सर्वांच्या मिसळत. अनेक मल्लांना ते मदत करत. महाराष्ट्र केसरी इस्माईल शेख, उपमहाराष्ट्र केसरी शंकर तोडकर, सिद्धेश्वर साखरे या तगड्या मल्लांच्या सोबतीने ते घडत होते.

१९८० मध्ये नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ८५ किलो वजनी गटात त्यांनी चमकदार कामगिरी केली. पोकळ घिस्सा, डंकी या डावांवर कुस्ती मारण्यात त्यांचा हातखंडा होता. कुस्तीचा आखाडा गाजवून गावी परतल्यानंतर ते राजकारणाच्या आखाड्यात उतरले. साखर कारखान्याचे संचालक ते सलग तीनवेळा आमदार होत त्यांनी हॅट्रीक साधली. विधानसभेत त्यांचा रांगडा आवाज गेली बारा वर्षे घुमत होता. राजकारणात असले तरी त्यांच कुस्ती प्रेम कायम होतं. कुस्तीच्या स्पर्धा भरवत त्यांनी अनेक मल्लांना प्रोत्साहित केले. त्यांच्या जाण्याने एक रांगडा नेता पडद्याआड गेला आहे.

बिंदु चौकात पवारांचे भाषण ऐकलं अन् राजकारणात उतरले...

भालकेनां कुस्तीबरोबर राजकारणाचंही आकर्षण होतं. शाहूपुरी तालमीत सरावाला असताना बिंदू चौकात शरद पवार यांचं भाषण असल्याचं भालके यांना समजलं. ते भाषण ऐकायला पोहचले. पवारांच्या भाषणाने ते प्रभावित झाले. गावाकडे परतत थेट लक्ष्मण ढोबळे यांच्या निवडणूक प्रचारात ते सहभागी झाले. शरद पवार यांच्यावर त्यांची निष्ठा कायम होती. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासारख्या बड्या नेत्याला पराभूत करून ते पहिल्यादा आमदार झाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख