ग्रामपंचायत निवडणूकीत माण तालुक्यात काँग्रेसची अस्तित्वाची लढाई 

माण तालुक्‍यात जोपर्यंत एक चांगले नेतृत्व मिळत नाही तोपर्यंत कॉंग्रेस उभारी घेऊ शकत नाही. तोपर्यंत पक्ष सांभाळण्याची तारेवरची कसरत दुसऱ्या फळीतील नेतेमंडळींनाच करावी लागणार आहे.
The battle for the existence of Congress in Maan taluka in the Gram Panchayat elections
The battle for the existence of Congress in Maan taluka in the Gram Panchayat elections

बिजवडी (ता. माण) : माण तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणूकांच्या निमित्ताने राजकीय आखाडा रंगला आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या वरिष्ठ नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नेतेमंडळी निवडणुका लढवत आहेत. मात्र, माणच्या राजकीय आखाड्यात काँग्रेस पक्ष कुठेच दिसून येत नाही. निवडणुकीत पक्षाच्या नेतृत्वाखाली पॅनेल न टाकल्यामुळे फक्त बघ्याची भूमिका दिसून येते.

याला एकमेव कारण आहे ते म्हणजे नेतृत्व. माण तालुक्‍याला सक्षम नेतृत्व नसल्याने दुसऱ्या फळीतले नेतेमंडळी पक्षाचे फक्त अस्तित्व टिकवत आहेत. महाविकास आघाडीमुळे तालुक्‍यात काँग्रेस पक्षाची दयनीय अवस्था झाकली जात असली तरी नेतृत्वहिन काँग्रेस अस्तित्वाची लढाई लढताना दिसून येत आहे. 

माण तालुक्‍यात 2009 पूर्वी कॉंग्रेसची अवस्था दयनीयच होती. आमदार जयकुमार गोरे पक्षात आल्यानंतर पक्षाला उभारी मिळाली. विविध सत्तास्थाने ताब्यामध्ये घेत त्यांनी पक्षाची ताकद वाढवली. मात्र, कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत आमदार गोरेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसला घरघर सुरू झाली. नेतृत्वाअभावी पक्षाची अवस्था पहिल्यासारखी दयनीय होऊन बसली आहे. पक्ष अगोदरच तळागाळापर्यंत पोचलेला आहे.

याला केवळ पाठबळाची गरज असताना पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याऐवजी दुसऱ्या फळीतले नेते पक्षाचे अस्तित्व टिकवताना दिसून येत आहेत. पक्ष संघटना मजबूत करून वाढवण्यासाठी नियोजनात्मक कार्यवाहीची गरज असताना नेतृत्वाच्या अभाव दिसून येतो. त्यात तालुक्‍यातील नेते मंडळींच्यातही एकी दिसून येत नाही. स्थानिक निवडणुकांच्या निमित्ताने लोकांपर्यंत पोचता येते.

सत्ता मिळो अथवा न मिळो पण लढणे गरजेचे आहे. यानिमित्ताने पक्षवाढीसाठी प्रयत्न करता येतात. परंतु, या स्थानिक निवडणुकांत कॉंग्रेस पक्षच दिसून येत नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून काही ठिकाणी निवडणुका लढवल्या जात असल्या तरी त्याठिकाणी कॉंग्रेसचा म्हणावा तेवढा पुढाकार दिसून येत नाही. यानंतर विकास सोसायट्या, जिल्हा बॅंक, बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत पक्ष कोणती भूमिका घेणार, हे पाहणेही औत्सुक्‍याचे ठरणार आहे. तालुक्‍यात जोपर्यंत एक चांगले नेतृत्व मिळत नाही तोपर्यंत कॉंग्रेस उभारी घेऊ शकत नाही. तोपर्यंत पक्ष सांभाळण्याची तारेवरची कसरत दुसऱ्या फळीतील नेतेमंडळींनाच करावी लागणार आहे. 

"माण तालुक्‍यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला असून, अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक पातळीवर आघाडी करत आम्ही उमेदवार दिले आहेत.'' 
- एम. के. भोसले, अध्यक्ष, माण तालुका कॉंग्रेस 

"टाकेवाडी, स्वरूपखानवाडी, शिंदी खुर्द, तोंडलेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कॉंग्रेस विचारांच्या लोकांची बैठक घेऊन प्रयत्न केले. तर वारूगड, देवापूर, पिंगळी बुद्रुक, भांडवली  या ठिकाणी स्थानिक पातळीवर कॉंग्रेस विचाराच्यांना उमेदवाऱ्या दिल्या आहेत.'' 

-दादासाहेब काळे, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com