सातारा : महायुती सरकारच्या काळात मराठा समाजाच्या समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाचा प्रश्न योग्य पध्दतीने हाताळला होता. मात्र, सध्याचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे या पदावरून अशोक चव्हाण यांना हटवावे व एकनाथ शिंदे यांना समितीच्या अध्यक्षपदी नेमावे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती, अशी माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ शासनाने बरखास्त केले आहे. यापार्श्वभूमीवर या महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आपली भूमिका मांडली.
नरेंद्र पाटील म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचे मी सोने करण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्री चर्चा न करता असा निर्णय घेतली, असे वाटलं नव्हतं. मी मांडत असलेली भुमिका अशोक चव्हाण यांना पटली नसावी. त्यातूनच हा प्रकार झाला असावा.
नांदेडमध्ये मी त्यांच्याविरोधात भूमिका मांडली होती. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह संचालक मंडळाला बरखास्त करताना अशोक चव्हाण यांनी दबाव टाकला असेल किंवा राष्ट्रवादीने देखील मागणी केल्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारच्या या निर्णयामुळे आता माझी भूमिका मी अधिक तीव्र करणार आहे. आता तर अशोक चव्हाण हटाव ही मागणी आणखी जोरदारपणे मांडणार आहे. त्यांच्या जागी एकनाथ शिंदे यांच्या निवडीची मागणी लावून धरणार आहे.
श्री. पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात केलेल्या मराठा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील होते. ते सर्वांना एकत्र घेऊन बसून निर्णय घ्यायचे. त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न योग्य पध्दतीने हाताळला होता. विविध योजना आणल्या होत्या. मात्र, अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एकही बैठक झाली नाही. न्यायालयात युक्तीवाद काय करायचा याबाबत चर्चा ही ते करत नव्हते.
त्यांनी वकिलांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे दोन तारखांचे निकाल मराठा समाजाच्या विरोधात गेले. त्यामुळे मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय. अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत. पण त्यांना कर्तृत्व दाखविता आले नाही. त्यांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण प्रश्ना अपयश आले असून समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना मराठा समाज समितीच्या अध्यक्षपदावरून हटवावे, अशी माझी मागणी आहे.
यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. तसेच ज्यांनी मला या महामंडळावर काम करण्याची संधी दिली त्यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांची देखील मी भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाची लढाई आणखी तीव्र करणार आहोत. यापुढे अशोक चव्हाण आमच्या रडारवर असतील. माझ्याकडे हे महामंडळ राहावे, यासाठी मी कधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली नाही आणि हुजरेगिरी ही केली नाही.
आम्ही यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती, एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाची जी उपसमिती आहे. त्यावर त्यांना अध्यक्ष करा. कारण त्यावेळी भाजप व शिवसेनेचे सरकार होते. त्यावेळच्या उपसमितीत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनी चांगल्या प्रकारे काम केले होते. मराठा समाजाच्या मुलांसाठी ठाणे जिल्ह्यात पहिले वसतीगृह झाले ते एकनाथ शिंदेंच्यामुळेच. त्यांचे यामध्ये मोठे योगदान आहे. मात्र, आमची विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्यच केली नाही. त्यांनी अशोक चव्हाणांना आणून बसविले, अशी टीकाही त्यांनी केली.

