उदयनराजे, शशिकांत पवारांचा बोलविता धनी दुसराच : शशिकांत शिंदे - Adv. Shashikant Pawar has never taken a firm stand on the reservation issue | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

उदयनराजे, शशिकांत पवारांचा बोलविता धनी दुसराच : शशिकांत शिंदे

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 2 डिसेंबर 2020

आज मंडल आयोगाची चर्चा आज करताना 20 वर्षांपासून या विषयावर तुम्ही एक चकार शब्द का काढला नाही. दरम्यानच्या काळात तुम्ही शरद पवार यांच्याकडे सातत्याने येत होता, भेटत होता. त्यावेळी शरद पवार यांच्यापुढे तुम्ही का तक्रारी मांडल्या नाहीत, असा प्रश्‍न आमदार शिंदे यांनी उपस्थित केला.

सातारा : मराठा महासंघाचे नेते ऍड. शशिकांत पवार यांनी आरक्षण प्रश्‍नावर कधीही परखड भूमिका घेतलेली नाही. आता त्यांनी खासदार उदयनराजेंना सोबत घेऊन त्यांच्या नावाचा वापर करत मराठा आंदोलन व मंडल आयोगाचा आधार घेत बाप दाखवा नाही तर श्राध्द घाला.. असे आव्हान देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांचा बोलविता धनी दुसराच कोणीतरी असून स्ट्राँग मराठा नेत्यांला लक्ष करण्याचा प्रयत्न ते कोणाच्या तरी सांगण्यावरून करत आहेत, असे प्रतिउत्तर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले आहे.
 
मराठा महासंघाचे नेते ऍड. शशिकांत पवार व खासदार उदयनराजेंनी काल पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केलेल्या आरोपाचे खंडण करत आमदार शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला. 

शशिकांत शिंदे म्हणाले, कै. अण्णासाहेब पाटील यांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून फार मोठे आंदोलन केले. त्यांनी पहिल्यांदा मराठा समाजाला एकत्र केले. 1982 मध्ये मराठा आरक्षणाची बिजे रोवली गेली. या आंदोलनात ऍड. शशिकांत पवार ही सहभागी होते. अण्णासाहेब पाटील यांच्या निधनानंतर तुमचे नेतृत्व एवढे सक्षम होते, तर मराठा महासंघ पुढे ताकदीने का चालवू शकला नाही, याचे उत्तर द्यावे.

आज मंडल आयोगाची चर्चा आज करताना 20 वर्षांपासून या विषयावर तुम्ही एक चकार शब्द का काढला नाही. दरम्यानच्या काळात तुम्ही शरद पवार यांच्याकडे सातत्याने येत होता, भेटत होता. त्यावेळी शरद पवार यांच्यापुढे तुम्ही का तक्रारी मांडल्या नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित करून शिंदे म्हणाले, मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सगळे नेते बाजूला झाले.

सामान्य कार्यकर्त्यांनी नेतृत्व करून देशाला दिशा दाखविणारे आंदोलन केले. नेतृत्वाविना हे आंदोलन शांततेत करण्याचा इतिहास घडला व सरकारवर दबाव वाढला. आता या प्रश्‍नावर वेगवेगळी भूमिका मांडून शशिकांत पवार हे मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.  शशिकांत पवार यांनी आरक्षण प्रश्‍नावर कधीही परखड भूमिका मांडली नाही.

पण त्यांनी खासदार उदयनराजेंना सोबत घेऊन त्यांच्या नावाचा वापर करत मराठा आंदोलनाचा व मंडल आयोगाचा आधार घेत बाप दाखवा नाही तर श्राध्द घाला.. असे आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांचा बोलविता धनी दुसराच कोणीतरी आहे. स्ट्राँग मराठा नेत्यांला लक्ष करण्याचा प्रयत्न ते कोणाच्या तरी सांगण्यावरून करत आहेत.

हे सर्व होत असताना मराठा समाजातील कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे. आपली ताकद मोठी असून या ताकदीच्या जोरावर आपण सरकारला निर्णय घेणे भाग पडणार आहोत. त्यामुळे मराठा समाजाच्या या ताकदीचा ऍड. शशिकांत पवार यांनी फायदा घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख