राष्ट्रवादी युवकच्या अध्यक्षपदासाठी माणमध्ये चुरस; 31 इच्छुकांच्या मुलाखती - 31 aspirants for the post of President of Nationalist Youth Congress in Maan taluka | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी युवकच्या अध्यक्षपदासाठी माणमध्ये चुरस; 31 इच्छुकांच्या मुलाखती

रूपेश कदम
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

मुलाखतींच्या वेळी उपस्थित युवकांत कमालीचा जोश दिसत होता. ''मला संधी द्या मी राष्ट्रवादीसाठी झोकून देऊन काम करेन'', असेच प्रत्येक युवक सांगत होता. या युवकांमध्ये आजी- माजी पदाधिकारी होतेच; पण प्रथमच राजकारणात सक्रिय होऊ इच्छिणाऱ्या युवकांची संख्याही लक्षणिय होती. मुलाखतीसाठी आलेल्या युवकांपैकी बहुतेक जण पदवीधर आहेत. तालुका युवक अध्यक्षपदासाठी चार जणांमध्ये चुरस दिसत आहे.

दहिवडी (ता. माण) : माणमध्ये प्रथमच झालेल्या राष्ट्रवादी युवक अध्यक्षपदाच्या मुलाखतीसाठी कमालीची चुरस दिसून आली. 31 युवकांनी तालुकाध्यक्ष पदासाठी मुलाखत दिली असून, यात उच्चविद्याविभूषित युवकांची संख्या लक्षणीय आहे. 

राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी युवकची सर्व कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर नव्याने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या करण्यासाठी तालुकानिहाय बैठका व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, माण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. संदीप पोळ, सातारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे, राष्ट्रवादी युवकचे प्रभारी संकल्प डोळस, सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तेजस शिंदे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोरख नलवडे, राष्ट्रवादीचे माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत उपस्थित होते. 

या मुलाखतींच्या वेळी उपस्थित युवकांत कमालीचा जोश दिसत होता. ''मला संधी द्या मी राष्ट्रवादीसाठी झोकून देऊन काम करेन'', असेच प्रत्येक युवक सांगत होता. या युवकांमध्ये आजी- माजी पदाधिकारी होतेच; पण प्रथमच राजकारणात सक्रिय होऊ इच्छिणाऱ्या युवकांची संख्याही लक्षणिय होती. मुलाखतीसाठी आलेल्या युवकांपैकी बहुतेक जण पदवीधर आहेत. तालुका युवक अध्यक्षपदासाठी चार जणांमध्ये चुरस दिसत आहे.

पिंगळी बुद्रुकचे माजी सरपंच व पंचायत समिती निवडणुकीत ज्यांनी शेखर गोरे यांना जबरदस्त झुंज दिली होती, असे श्रीकांत जगदाळे, बनगरवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष विक्रम शिंगाडे,
म्हसवडच्या राजघराण्यातील पृथ्वीराज राजेमाने, तसेच दहिवडी नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक महेंद्र जाधव या चौघांचीही राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पार्श्‍वभूमी आहे.

युवकांचे मोठे पाठबळ प्रत्येकाकडे आहे. त्यामुळे कोणाला अध्यक्ष करायचे यावरून वरिष्ठ व निवड समितीची डोकेदुखी वाढली आहे. जो कोणी पक्ष
वाढविण्यासाठी वेळ देईल व ज्याच्यात धमक असेल त्यालाच अध्यक्ष पद द्यावे, अशी मागणी युवक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख