मोहित्यांच्या 'रयत'ला विश्वजित कदमांची बॅटरी; कृष्णा कारखान्यात तिरंगी लढत - Vishwajit Kadam's battery to Mohiti's 'Rayat'; Triangular fight in Krishna factory | Politics Marathi News - Sarkarnama

मोहित्यांच्या 'रयत'ला विश्वजित कदमांची बॅटरी; कृष्णा कारखान्यात तिरंगी लढत

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 18 जून 2021

त्यात सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी एकमुखी डॉ. मोहिते यांच्या रयत पॅनेलला नुसता पाठिंबा दिला नाही, तर पॅनेलचे सारथ्य तेच करत आहेत. त्यामुळे कृष्णातील चुरस वाढणार आहे.

कऱ्हाड : सातारा व सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्यादिवशी तिरंगी होणार स्पष्ट झाले. त्यामुळे पुढील काही दिवसांत कृष्णाकाठ पावसाच्या मुसळधारेसोबतच राजकीय गदारोळही अनुभवणार आहे. कृष्णेच्या रणांगणात २१ जागांसाठी तिन्ही पॅनेलचे मिळून ६६ अर्ज शिल्लक राहिले आहेत. Vishwajit Kadam's battery to Mohiti's 'Rayat'; Triangular fight in Krishna factory
 
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत नेहमीच चुरस राहिली आहे. सत्तांतर व आरोपांच्या फैरीने सभा गाजल्या आहेत. कारखान्याने २०१० रोजी ऐतिहासिक सत्तांतर पाहिले. त्यानंतर कृष्णा कारखान्यात २०१५ पासून तीन पॅनेलची परंपरा आली ती आजअखेर कायम आहे. यंदा कृष्णा कारखाना ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी भोसले गटाभोवती व्यूहरचना आखण्यासाठी विरोधी आघाड्यांच्या एकत्रीकरणाचे प्रयत्न सहा महिन्यांपासून सुरू आहेत.

हेही वाचा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष अडचणीत; दहा दिवसांत दुसरा गुन्हा दाखल

संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते व रयत पॅनेलचे डॉ. इंद्रजित मोहिते यांचे एकत्रीकरण व्हावे, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू होते. त्यात आमदार पृथ्वीराज चव्हाण, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, युवा नेते अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यासह पहिल्या, दुसऱ्या फळीतील नेते सक्रिय होते. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशीही त्याबाबत चर्चा झाली होती.

आवश्य वाचा : आरक्षणासाठी राज्य सरकारवर नव्हे..केंद्रावर दबाब आणा..

मात्र त्यांच्यात एकत्रीकरण होऊ शकले नाही. आमदार चव्हाण यांनी एकत्रीकरणाचे प्रयत्न थांबविल्याचे जाहीर करावे लागले. कोणीच माघार घेण्यास तयार नसल्यानेही अडचणी येत होत्या. अखेरपर्यंत प्रयत्नांच्या पराकाष्ठा झाल्या. मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कृष्णात तिरंगी लढत अटळ असल्याचे स्पष्ट झाले. निवडणूक तिरंगी होणार असली, तरी ती चुरशीची असणार आहे, त्याचे संकेत देणाऱ्या राजकीय घडामोडी येथे घडल्या आहेत.

त्यात सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी एकमुखी डॉ. मोहिते यांच्या रयत पॅनेलला नुसता पाठिंबा दिला नाही, तर पॅनेलचे सारथ्य तेच करत आहेत. त्यामुळे कृष्णातील चुरस वाढणार आहे. कोणता गट कोणाच्या बाजूने याची चर्चा असताना उंडाळकर गटाने कालच संस्थापक पॅनेलला पाठिंबा जाहीर केला. अॅड. उदयसिंह पाटील यांनी घोषणा केली. त्यामुळे आमदार चव्हाण यांचा गट काय करणार याकडे लक्ष लागून होते.

मंत्री कदम, डॉ. इंद्रजित मोहिते यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. त्या वेळी आमदार चव्हाण यांच्या गटाच्या शिलेदारांची तेथील उपस्थिती बरेच काही सांगून गेली. आमदार चव्हाण यांच्या समर्थकांना डॉ. मोहिते यांच्या गटात मिळालेली उमेदवारीवरूनही चुरशीच्या लढतीचे अंदाज बांधले जात आहेत. सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांच्या विरोधात अविनाश मोहितेंसह डॉ. इंद्रजित मोहिते यांनीही तेवढीच जय्यत तयारी केल्याचे दिसून येते. 

कॉँग्रेसमध्ये दुफळी...

आमदार पृथ्वीराज चव्हाण व उंडाळकर गट यांच्यातील सलोखा अलीकडे वाढला होता. उंडाळकर गटाने कालच संस्थापक पॅनेलला पाठिंबा जाहीर केला असताना आमदार चव्हाण यांचा गट डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या बाजूने उभा राहिला आहे. त्यामुळे कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीने पुन्हा एकदा कॉँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली. उंडाळकर गट संस्थापक, तर पृथ्वीराज बाबा गट रयत पॅनेलकडे आहे.

सहकार राज्यमंत्री कदम यांच्या पत्रकार परिषदेला आमदार चव्हाण यांच्या गटाचे कऱ्हाड दक्षिणचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, जखीणवाडीचे नरेंद्र पाटील, मलकापूरचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, पंचायत समितीचे सदस्य उत्तमराव पाटील, सदस्य नामदेव पाटील, 'कृष्णा'चे माजी संचालक बाळासाहेब जगताप, राजेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीने  वातावरण ढवळून निघाले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख