कोरोना लॉकडाऊनमध्ये अनोखा फंडा; रेशन दुकानात दारूची विक्री
wine sale in Ration shop

कोरोना लॉकडाऊनमध्ये अनोखा फंडा; रेशन दुकानात दारूची विक्री

चिमणगाव हद्दीतील त्या सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानामध्ये अचानकपणे छापा टाकला.यावेळी दुकानात व दुकान मालकाच्या जीपमध्ये (एमएच 11 बीव्ही 3553) आढळून आलेला देशी- विदेशी दारूच्या बाटल्यांसह एकूण सात लाख आठ हजार 576 एवढ्या किमतीचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला.

कोरेगाव : चिमणगांव (ता. कोरेगाव) येथे सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानात बेकायदेशीरपणे देशी- विदेशी दारूची विक्री करणाऱ्या एकावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. यामध्ये सात लाख आठ हजार 576 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश एकनाथ जाधव (रा. चिमणगांव, ता. कोरेगाव) असे या प्रकरणातील संशयिताचे नाव आहे. चिमणगांव येथे एक जण त्याच्या मालकीच्या सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानामध्ये बेकायदेशीरपणे दारूची चोरटी विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना गुरुवारी (ता. 28) मिळाली होती.

त्याआधारे त्यांनी सहायक निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून त्यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार या पथकाने गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास चिमणगाव हद्दीतील त्या सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानामध्ये अचानकपणे छापा टाकला. यावेळी दुकानात व दुकान मालकाच्या जीपमध्ये (एमएच 11 बीव्ही 3553) आढळून आलेला देशी- विदेशी दारूच्या बाटल्यांसह एकूण सात लाख आठ हजार 576 एवढ्या किमतीचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला.

पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेप्रमाणे व गुन्हे शाखेचे निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रमेश गजें, सहायक फौजदार जोतिराम बर्गे, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पोलिस नाईक शरद बेबले, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, पोलिस कॉन्स्टेबल विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, संकेत निकम यांनी ही कारवाई केली. यासंदर्भात गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल रोहित जगन्नाथ निकम यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in