गृहराज्यमंत्र्यांचा पाटण तालुका व्हेंटिलेटर बेड विनाच; रुग्णांचा जीव टांगणीला  - There is no ventilator bed available in Patan taluka | Politics Marathi News - Sarkarnama

गृहराज्यमंत्र्यांचा पाटण तालुका व्हेंटिलेटर बेड विनाच; रुग्णांचा जीव टांगणीला 

विलास माने
शनिवार, 24 एप्रिल 2021

वर्षभरापासून व्हेंटिलेटर बेडअभावी रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्याचबरोबर व्हेंटिलेटरसाठी तालुक्‍यातील रुग्णांना कऱ्हाड, सातारा, पुणे, कोल्हापुरला उपचारासाठी हालवावे लागते.

मल्हारपेठ : खासदार, माजी मुख्यमंत्री, राज्य मंत्र्याचा पाटण तालुका असतानाही कोरोनाच्या कठीण काळातही तालुक्‍यात एकाही व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था नाही. तीन कोविड रुग्णालय, दोन ग्रामीण रुग्णालय, 13 प्राथमिक आरोग्य केंद्र, दोन डझनभर खासगी हॉस्पिटल असताना एकही व्हेंटिलेटर बेड नाही. त्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. 

गेल्या वर्षभारापासून कोरोना संसर्गाच्या फैलाव सुरु आहे. दुसऱ्या लाटेत संसर्गाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. बेड, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना धावाधाव करावी लागत आहे. सध्या, शासकीयसह खासगी रुग्णालयातील बेड फुल्ल झाली आहेत. 

पाटण तालुक्‍याची लोकसंख्या तीन लाख ६८ हजार ३९६ इतकी आहे. सध्या तालुक्‍यात दोन ग्रामीण रुग्णालये, १३ प्राथमिक आरोग्य केंद्र, ६३ आरोग्य उपकेंद्र, पाटण, नवारस्ता, मल्हारपेठ, ढेबेवाडी, तळमावले तारळे या मोठ्या बाजारपेठांमध्ये अंदाजे दोन डझनभर खासगी रुग्णालये आहेत. मात्र, या एकाही रुग्णालयात व्हेंटिलेटरचे बेड नाही, ही शोकांतिका आहे. 

वर्षभरापासून व्हेंटिलेटर बेडअभावी रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्याचबरोबर व्हेंटिलेटरसाठी तालुक्‍यातील रुग्णांना कऱ्हाड, सातारा, पुणे, कोल्हापुरला उपचारासाठी हालवावे लागते. पाटण तालुका हा खासदार, माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री, सध्याच्या गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा तालुका असतानाही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही, हे विशेषच आहे. आपत्कालिन स्थितीत रुग्णांना चांगली सेवा मिळण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. 

पाटण तालुक्‍यात नेत्यांनी एखादे तरी व्हेंटीलेटर बेडचे हॉस्पिटल सुरु करावे. व्हेंटिलेटरअभावी काहींचे प्राण गेलेत. या पुढील काळात निदान दक्षता घ्यावी. 

- हर्षद देसाई, ग्रामस्थ, ठोमसे 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख