वीज वितरणच्या निषेधार्थ साताऱ्यात स्वाभिमानीचा रास्ता रोको; पोलिस-कार्यकर्त्यांत वादावादी - Swabhimani's roadblock in Satara to protest against power distribution; Controversy among police-workers | Politics Marathi News - Sarkarnama

वीज वितरणच्या निषेधार्थ साताऱ्यात स्वाभिमानीचा रास्ता रोको; पोलिस-कार्यकर्त्यांत वादावादी

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 19 मार्च 2021

कोरेगाव-सातारा मार्गावर वाहतूकीची कोंडी निर्माण झाल्याने पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरवात केली. यावेळी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही स्वतःहून चालत पोलिस ठाण्यात येतो. त्यामुळे आम्हाला अटक करू नका, अशी भूमिका घेतली.

सातारा : वीज वितरण कंपनीच्या अन्यायकारक वीज बिलांची वसुली व कनेक्शन तोडण्याच्या मोहिमेच्या निषेधार्थ आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या सूचनेनुसार स्वाभिमानीच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कृष्णानगर येथील वीज वितरणच्या कार्यालयासमोर रास्ता रोको केले. यावेळी सातारा-पंढरपूर मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आम्ही चालत पोलिस ठाण्यात येतो, असे सांगूनही पोलिसांनी जबरदस्ती करत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने पोलिस व कार्यकर्त्यांत वादावादी झाली.

कोरोना काळातील आलेली वाढीव वीज बिलांमुळे सर्वसामान्य जनतेला वीज बिले भरता आलेली नाही. त्यामुळे वीज वितरणची थकबाकी वाढल्याने त्यांनी मार्चअखेर डोळ्यासमोर ठेऊन वीज बिलांची वसुली सुरू केली आहे. ही वीज बिले माफ करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. मात्र, वीज बिल न भरणाऱ्यांचे कनेक्शन तोडली जात आहेत. याचा सर्वाधिक फटका शेतकरी व सर्वसामान्य जनतेला बसला आहे.

या अन्यायकारक वसुलीच्या विरोधात स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याची सूचना केली होती. त्यानुसार साताऱ्यातील कृष्णानगर येथील वीज वितरणच्या  कार्यालयासमोर स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन झाले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

या आंदोलनात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरीक सहभागी झाले होते. यावेळी सातारा-पढरपूर मार्गावर वाहतूकीची कोंडी निर्माण झाल्याने पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरवात केली. यावेळी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही स्वतःहून चालत पोलिस ठाण्यात येतो. त्यामुळे आम्हाला अटक करू नका, अशी भूमिका घेतली.

मात्र, पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे पदाधिकारी व पोलिसांत वादावादीचा प्रकार झाला. या आंदोलनात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्यासह अर्जूनराव साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव, ॲड. विजय चव्हाण, मनोहर येवले, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख