सातारा : गडचिरोली येथे केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल केंद्र शासनाने इंटेलिजेन्स मेडल, तर राज्य शासनाने विशेष सेवा पदक देऊन साताऱ्याचे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना सन्मानित केले आहे.
अजय कुमार बन्सल यांनी 13 ऑगस्ट 2018 मध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून गडचिरोलीमध्ये पदभार स्वीकारला होता.त्यानंतर त्यांनी दक्षिण गडचिरोली या दुर्गम व अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात नागरिकांचा विश्वास संपादन करून गोपनीय खबऱ्यांचे जाळे निर्माण केले.
त्यामुळे गडचिरोली, तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातूनही गोपनीय माहिती मिळण्यास मदत झाली. त्यामुळे सी-60 पथकांना गडचिरोली, छत्तीसगडच्या सीमावर्ती नक्षलविरोधी मोहिमा यशस्वीरीत्या राबविता आल्या. या कामाची दखल घेऊन केंद्र शासनाने त्यांना इंटेलिजेन्स मेडल जाहीर केले.
त्यांच्यासह राज्यातील सात पोलिस अधिकारी व अंमलदार यांना हा सन्मान मिळाला आहे. त्याचबरोबर त्यांनी गडचिरोली भागात सलग दोन वर्ष सेवा करून उल्लेखनीय काम केल्याबद्दल राज्य शासनाने त्यांना विशेष सेवा पदक जाहीर केले आहे. पोलिस महासंचालकांच्या हस्ते त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले.

