शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी करणार कोरोना लसीकरणाची जागृती   - Shivsena, Yuva sena office bearers will raise awareness about corona vaccination | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी करणार कोरोना लसीकरणाची जागृती  

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 3 एप्रिल 2021

शिवसेना पक्षाच्यावतीने यामध्ये पुढाकार घेऊन जिल्हयातील, विविध तालुक्यातील, त्या-त्या विभागातील सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, व कार्यकर्ते तसेच युवा सेना संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिक व महिलांपर्यंत पोहोचावे.

सातारा : कोविड 19 चा संसर्ग होऊ नये म्हणून सध्या राज्य शासनाकडून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली आहे. या लसीकरणाबाबत जिल्हयातील शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन नागरिकांत लसीकरणबाबत जनजागृती करुन ही मोहिम यशस्वीरित्या राबवावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना लेखी पत्राव्दारे केले आहे. 

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी पत्रात म्हटले की, राज्यात सध्या कोविड 19 या आजाराचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढीचे प्रमाणही जास्त आहे. कोविड 19 चा संसर्ग होऊ नये म्हणून राज्य शासनाकडून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरवात केली आहे.

त्यामुळे शिवसेना पक्षाच्यावतीने यामध्ये पुढाकार घेऊन जिल्हयातील, विविध तालुक्यातील, त्या-त्या विभागातील सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, व कार्यकर्ते तसेच युवा सेना संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिक व महिलांपर्यंत पोहोचावे. 45 वर्षांवरील ज्या नागरिक, महिलांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली नाही.

अशा नागरिक महिलांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण करुन घेण्यासाठी प्राधान्यक्रमाने कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहिम हाती घ्यावी. ही मोहिम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी शिवसेना पक्षाचेवतीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशी सूचना श्री. देसाई यांनी केली आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख