वीजप्रश्नावर शिवसैनिक आक्रमक; पुसेगावात वसुली अधिकाऱ्यांची गाडी फोडली - Shivsainiks smashed the vehicle of the power distribution recovery officer | Politics Marathi News - Sarkarnama

वीजप्रश्नावर शिवसैनिक आक्रमक; पुसेगावात वसुली अधिकाऱ्यांची गाडी फोडली

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 15 मार्च 2021

महावितरणने ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी किमान दोन दिवसांची मुद्दत द्यावी. तसेच गोर-गरीब जनतेवर अरेरावी व दमदाटीची भाषेचा वापर करू नये अशा सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

विसापूर (ता. खटाव) : सध्या वीजबिलांच्या वसुलीसाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम हाती घेतली आहे. अर्थसंकल्पिय अधिवेशन संपताच दुष्काळी खटाव तालुक्यातील पुसेगावसह परिसरातील वीजबिल थकीत ग्राहकांचे कनेक्शन कोणतीही पूर्वसूचना न देता अरेरावीची भाषा वापरत तोडली जात आहेत. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी थेट वीज वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गाडी फोडली.

विज वितरणच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात वीजबिलाच्या थकबाकीची वसुली जोरदारपणे सुरू केली आहे. त्यासाठी वसुली अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. खटाव तालुक्यातील पुसेगाव परिसरात ही वसुली मोहिम सुरू असल्याचे पाहून शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यांनी आज पुसेगावात विज वितरणच्या वसुली अधिकाऱ्यांची गाडीच फोडली.

कोणत्याही  परिस्थितीत पूर्व सूचना दिल्याशिवाय एकाही ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करू देणार नाही, असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.यावेळी प्रताप जाधव म्हणाले, सध्या घरगुती आणि कृषी पंपाच्या वीज बिलांच्या वसुलीचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिक, व्यावसायिक, शेतकरी लॉकडाऊन तसेच अवकाळीच्या संकटातून सावरत असतानाच महावितरणने अरेरावीची भाषा वापरात वीज तोडणीचा एक कलमी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

महावितरणने ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी किमान दोन दिवसांची मुद्दत द्यावी. तसेच गोर-गरीब जनतेवर अरेरावी व दमदाटीची भाषेचा वापर करू नये अशा सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. सध्याची ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती पाहता राज्य सरकारने दुष्काळी भागातील वीज तोडणीबाबत वेगळा निकष लावून दुष्काळी भागातील जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी देखील यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली.

दरम्यान, महावितरणने आपल्या कारभारात सुधारणा न करता, तसेच कोणतीही पूर्वकल्पना न देता अरेरावीची भाषा वापरात एका जरी ग्राहकांची वीज कनेक्शन तोडले तर शिवसेना याचा तीव्र विरोध करेल, अशी माहिती जाधव यांनी यावेळी दिली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख