कोरोना कहरात सातारा पालिका सुस्त; उदयनराजेंनी लक्ष घालावे...

पालिकेच्या नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांचे पती डॉ. संजोग कदम हे आरोग्य उपसंचालक आहेत. पती आरोग्य विभागाच्या वरिष्ठ पदावर आहे याचा तरी फायदा माधवी कदम यांनी सातारकरांना करून द्यायला हवा होता.
कोरोना कहरात सातारा पालिका सुस्त; उदयनराजेंनी लक्ष घालावे...
Satara municipality sluggish while corona infection increased; Udayanraje should pay attention

सातारा : कोरोनाचे दररोज दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण संख्या वाढत आहे. जिल्हा रुग्णालय, जम्बो कोव्हीड सेंटर यासह सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयांत बेड मिळेना झाले आहेत. रुग्णालयांच्या बाहेर रुग्णांच्या रांगा पहायला मिळत आहेत. अशी भयानक परिस्थिती असताना सातारा पालिकेकडून (satara Palika) नागरिकांसाठी कोणतीही सुविधा दिली जात नाही. कोरोनाचा कहर सुरु असताना सातारा पालिका सुस्त का बसून आहे, असा प्रश्न आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी उपस्थित केला आहे. सध्या गोवा राज्यातही लॉकडाउन असून उदयनराजेही (Udayanraje Bhosale) साताऱ्यात आहेत. आता त्यांनीच या प्रश्नात लक्ष घालावे, अशी विनंती आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. (Satara municipality sluggish while corona infection increased; Udayanraje should pay attention)

सातारा पालिकेकची हद्दवाढ झाली असून शाहूपुरी, शाहूनगर आदी उपनगरे पालिकेत समाविष्ट झाली आहेत. यापूर्वी शाहूपुरी सारख्या ग्रामपंचायती कण्हेर आरोग्य केंद्राशी जोडल्या होत्या मात्र आता शहराशी जोडल्या गेल्या आहेत. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून उपलब्ध आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही आणि उपचाराअभावी रुग्ण दगावत आहेत. होम आयसोलशनमध्ये मोठ्या प्रमाणत रुग्ण असून त्यांच्यामुळे कुटुंबातील इतर व्यक्तींना लागण होण्याचा धोका आहे. घर लहान असेल तर हा धोका वाढत असून बहुदा यामुळेच रुग्णसंख्या वाढत आहे. 

14 व्या वित्त आयोगाच्या व्याजाचे पैसे कोरोना आपत्ती निवारणासाठी खर्च करावेत अशा सूचना शासनाने पालिकेला दिल्या आहेत. रहिमतपूर सारख्या छोट्या नगर पालिकेने तेथील नागरिकांसाठी कोरोना केअर सेंटर सुरु केले असून अगदी बेड, लाईट व्यवस्था, ऑक्सिजनसह सर्व सुविधा या सेंटरसाठी या पालिकेने दिल्या आहेत. रहिमतपूर सारखी छोटी नगरपालिका नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देत असेल तर शासनाने सूचना देऊनही सातारा सारखी मोठी अ वर्ग नगरपालिका थंड का पडली आहे, हा खरा प्रश्न आहे.

सातारा शहर आणि लगतच्या उपनगरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा वेळी पालिकेने काहीतरी सुविधा देणे अपेक्षित होते. सातारा शहर आणि आसपासच्या परिसरात मोठमोठी मंगल कार्यालये आहेत. पालिकेचे स्वतःचे मंगल कार्यालय आहे. अशा ठिकाणी रुग्णांसाठी किमान आयसोलेशन वार्ड तरी पालिकेने सुरु केल्यास त्याचा सातारकरांना फायदा होईल, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे. आरोग्य उपसंचालक पदाचा फायदा करून घ्यासर्व प्रकरच्या उपलब्धी असताना पालिकेकडून काहीही सुविधा दिली जात नाही या मागचे गौडबंगाल काय असावे? हा खरा प्रश्न आहे.

पालिकेच्या नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांचे पती डॉ. संजोग कदम हे आरोग्य उपसंचालक आहेत. पती आरोग्य विभागाच्या वरिष्ठ पदावर आहे याचा तरी फायदा माधवी कदम यांनी सातारकरांना करून द्यायला हवा होता. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. सातारा पालिकेने आपली जबाबदारी ओळखून सातारकरांच्यासाठी उपचारासाठी काहीतरी सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि सातारकरांना दिलासा द्यावा, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

परवाच खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन कोरोना संदर्भात बैठक घेतली. आता गोवा राज्यातही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे आणि उदयनराजे सुद्धा साताऱ्यात आहेत. आता त्यांनीच या प्रश्नात लक्ष घालावे अशी विनंती आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. तुमच्याशिवाय पालिका प्रशासन आणि नगरसेवक हलणार नाहीत. त्यामुळे तुम्हीच आता काहीतरी करा आणि सातारकरांसाठी पालिकेमार्फत एखादी तरी सुविधा उपलब्ध करून द्या, अशी विनंती त्यांनी केली आहे. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in