संभाजी भिडेंच्या 'त्या' वक्तव्याचा शिवेंद्रसिंहराजेंकडून समाचार  - Sambhaji Bhide's statement is wrong says MLA Shivendraraje | Politics Marathi News - Sarkarnama

संभाजी भिडेंच्या 'त्या' वक्तव्याचा शिवेंद्रसिंहराजेंकडून समाचार 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

आत्ताच्या परिस्थितीत अशी वक्तव्ये करणे पूर्णत: चुकीचे आहे. कोरोना सर्वसामान्यांनाही होतो आहे आणि पैसेवाल्यांनाही होतो आहे. यामध्ये अनेकजण दगावले आहेत. त्यामुळे कोरोनाबरोबर कोणी खेळ करु नये.'

सातारा : 'कोरोना कोणालाही होऊ शकतो. ती महामारी असून तो एक व्हायरस आहे. कोण शूर आणि कोण... हे त्या व्हायरसला माहित नसते. त्यामुळे कोरोना बाधितांबाबत अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी करणे योग्य नाही,' अशा शब्दात सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना फटकारले.

संभाजीराव भिडे यांनी 'मुळात कोरोना हा रोग नाही आणि ज्यांना कोरोना होतो ती माणसे जगायच्या लायकीची नाहीत. तो फक्त ...प्रवृत्तीच्या लोकांनाच होतो. तो एक मानसिक आजार आहे,' असे वक्तव्य सांगली येथे केले होते. त्याचा संदर्भ शिवेंद्रसिंहराजेंना छेडले असता ते म्हणाले, 'त्यांनी तसे बोलणे चुकीचे आहे.

कोरोना हा व्हायरस असून तो कोणालाही होऊ शकतो. मात्र, त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही. शेवटी कोणी शूर आहे आणि कोण... आहे, हे त्या व्हायरसला माहित नसते. आत्ताच्या परिस्थितीत अशी वक्तव्ये करणे पूर्णत: चुकीचे आहे. कोरोना सर्वसामान्यांनाही होतो आहे आणि पैसेवाल्यांनाही होतो आहे. यामध्ये अनेकजण दगावले आहेत. त्यामुळे कोरोनाबरोबर कोणी खेळ करु नये.'

 महाराष्ट्र सरकार कोरोना महामारीत अपयशी ठरले आहे, असे आपल्याला वाटते का, याप्रश्नावर त्यांनी अधिक बोलणे टाळत कोरोना महामारीचा वेग कमी झाल्यानंतर सरकारने थोडी तयारी करुन ठेवायला हवी होती, असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, 'दुसरी लाट येणार याची कोणाला कल्पना नव्हती. मात्र, सरकारने बेड, रेमडिसेवर आदींची काहीतरी व्यवस्था करायला हवी होती. मात्र, तसे काही झाले नाही.

त्यामुळे त्यामध्ये थोडीफार ढिलाई झाली आणि कोरोनाची दुसरी लाट येणार नाही, अशी भावना सरकार आणि आरोग्य विभागाची बनली असल्यामुळेच असे झाले असावे, असे मला वाटते. सातारा जिल्ह्यात रेमडिसेवर इंजेक्शन आणि कोविड लसीचा तुटवडा आहे. त्याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार किंवा काही प्रयत्न करणार आहे काय, यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, 'इंजेक्शनच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरु आहेत. वेळप्रसंगी संबंधित यंत्रणाशी मी स्वत: बोलणार आहे. लसीचा काही साठा आज सातारा जिल्ह्यात येणार आहे.

लॉकडाऊनबाबत तडकाफडकी निर्णय नको....

राज्य सरकार तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनचा विचार करत आहे, याविषयी विचारले असता आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, 'दोन दिवसांचा लॉकडाऊन आम्ही तंतोतंत पाळू. कोरोना व्हायरस स्प्रेड होऊ नये म्हणून आम्ही आवश्यक ती काळजी घेत आहे. मात्र, काही गोष्टींचा विचार करायला हवा. सण सुरु झाले आहेत. लोकांनी कर्ज काढून व्यवसाय उभे केले आहेत. त्यामुळे व्याज, हप्ते याचा विचार हवा. सरसकट तीन आठवडे लॉकडाऊन नसावा, अशी माझी भूमिका आहे. जिल्हा प्रशासन स्वत:हून काही निर्णय घेत नाही. राज्य सरकार ज्या सूचना करत आहे, त्याची अंमलबजावणी सुरु आहे. आम्ही सहकार्य करत आहे. मात्र, तडकाफडकी निर्णय घेवू नये.'
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख