खासबाब म्हणून सैन्य भरतीची वयोमर्यादा वाढवा; श्रीनिवास पाटलांची जनरल बिपिन रावत यांच्याकडे मागणी  - Raise the age limit for military recruitment as a matter of urgency; Srinivas Patil's demand to General Bipin Rawat | Politics Marathi News - Sarkarnama

खासबाब म्हणून सैन्य भरतीची वयोमर्यादा वाढवा; श्रीनिवास पाटलांची जनरल बिपिन रावत यांच्याकडे मागणी 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 मार्च 2021

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने भरती आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया आणखीन पुढे लांबली आहे. मात्र, त्यामुळे सध्या इच्छुक असलेल्या तरुणांची वयोमर्यादा संपण्याची भिती आहे. त्यामुळे वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी श्री. पाटील यांनी लष्करप्रमुख यांच्याकडे केली.  

कऱ्हाड : कोरोनाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सातारा जिल्ह्यासह अन्य ठिकाणची सैनिक भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे. अशा इच्छुकांची संधी हिरावू नये यासाठी भारत सरकारने खासबाब म्हणून या वर्षी सैनिक भरतीची वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंग यांच्यासह लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्याकडे केली. 

साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील लोकसभा अधिवेशनानिमित्त दिल्ली येथे आहेत. त्यावेळी त्यांनी लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांना प्रत्यक्ष भेटून याबाबतची मागणी केली. कोरोना संसर्गामुळे गत वर्षापासून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम सैनिक भरती प्रक्रियेवरती सुध्दा झाला आहे.

वर्षभरापासून भरती झालेली नाही. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया कोल्हापूर येथे घेण्यात येते. विशेषत: जिल्ह्याला फार मोठी सैनिकी परंपरा आहे. ती आजतागायत सुरू आहे. जिल्ह्यातून सैन्य दलात भरती होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. येथील बहुतांशी युवक सैन्यदलात जाण्यासाठी प्राधान्य देतात. त्यासाठी दोन वर्षे अगोदर शारीरिक व अन्य परिक्षेची तयारी करतात.

सैन्य दलात जाण्याचे स्वप्न बाळगणारे तरूण त्यासाठी खूप मेहनत घेतात. मात्र, सैन्य भरती प्रक्रिया वारंवार स्थगित होत असल्याने इच्छुकांची वयोमर्यादेमुळे आलेली संधी हुकत असून त्यांचे स्वप्न धोक्यात येत आहे. नुकतीच कोल्हापूर येथे होणारी सैन्य भरती पुन्हा काही काळ स्थगित केल्याने हजारो तरुणांची संधी हुकली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने भरती आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया आणखीन पुढे लांबली आहे. मात्र, त्यामुळे सध्या इच्छुक असलेल्या तरुणांची वयोमर्यादा संपण्याची भिती आहे. त्यामुळे वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी श्री. पाटील यांनी लष्करप्रमुख यांच्याकडे केली.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख