राजकिय आयुधे बाजूला ठेऊन मैदानात या; तुमच्या होकायंत्राला आमच्या शुभेच्छा.... - Put aside political weapons and come to the fore; Our best wishes to your compass says MLA Jaykumar Gore | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

राजकिय आयुधे बाजूला ठेऊन मैदानात या; तुमच्या होकायंत्राला आमच्या शुभेच्छा....

विशाल गुंजवटे
सोमवार, 28 जून 2021

एकतर तुम्हाला कुणीही मनापासून विचारत नाही. तुम्ही इथे आग लावून कांड्या पिकवण्याचे उद्योग करता असे तुमचेच पदाधिकारी खाजगीत बोलतात.

बिजवडी : गेल्या १५ वर्षात जंग जंग पछाडूनही तुम्हाला माण - खटाव मधील वाऱ्याची दिशा समजली नाही. महाराज, तुम्ही जेव्हा, जेव्हा माणमध्ये आला तेव्हा तेव्हा तुमचा पक्ष आणि तुमचे बगलबच्चे निवडणूका हरल्याचा इतिहास तुमच्या नावे झाला आहे. आजपर्यंत तुम्ही पालकमंत्री, विधान परिषद सभापती पदाची आयुधे घेऊन माणमध्ये आलात. आता ही सगळी राजकीय आयुधे बाजूला ठेवून मैदानात यायचे धाडस दाखवा, असे खुले आव्हान माण-खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना दिले. Put aside political weapons and come to the fore; Our best wishes to your compass says MLA Jaykumar Gore

माण - खटावमध्ये वाऱ्याची दिशा शोधणाऱ्या तुमच्या होकायंत्राला आमच्या शुभेच्छाच आहेत, मात्र आग लावून कांड्या पिकवायचे धंदे आता बंद करा, असा टोलाही त्यांनी लगावला. माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सभापती रामराजे यांच्या उपस्थितीत नुकतीच संवाद सभा झाली. त्यावेळी बोलताना रामराजेंनी माणमधील वाऱ्याचा अंदाज घ्यायला आलोय, कार्यकर्त्यांना मान खाली घालावी लागेल अशी तडजोड होणार नाही, अशी वक्तव्ये केली होती. 

हेही वाचा : भारताने अमेरिकेला केले ओव्हरटेक...कोरोना लसीकरणाची अशीही कामगिरी

यावर आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्या वक्तव्यांचा समाचार घेतला. आमदार गोरे म्हणाले, मी राजकारणात आल्यापासून गेल्या १५ वर्षात राजेंना माणमधील वाऱ्याची दिशा समजली नाही. ते जेव्हा जेव्हा इथे आले तेव्हा तेव्हा राष्ट्रवादी निवडणूकांमध्ये पराजीत झाली. राजेंचे अतिक्रमण इथल्या जनतेने प्रत्येक वेळी हाणून पाडले. आपण माण - खटावमध्ये 'बिन बुलाये महेमान' असता. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या येण्याने नाखूष असतात. आपला पायगुण चांगला नसल्याचे कार्यकर्त्यांना माहित आहे. त्यामुळे जबरदस्तीने त्यांच्यावर नेतृत्व लादायच्या भानगडीत पडू नका. 

आवश्य वाचा : विक्रमी लसीकरणाचा दावा खोटा ; मोदीजी, भारतीयांचे आयुष्य जनसंपर्क मोहिमेचे साधन नाही!

आमचे म्हणणे खरे आहे कि नाही हे एकदा तपासून पहा, तुमच्या कार्यकर्त्यांची भावना एकदा जासूसी करुन जाणून घ्या. आमदार गोरे म्हणाले, राजे आपल्याला निवडणूकीपुरताच माण - खटाव आठवतो. गेल्या १४ महिन्यांपासून इथली जनता कोरोना महामारीला मोठ्या धैर्याने तोंड देत आहे. अनेक जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याने अनेक संसार उघड्यावर पडले. लोकांना उपचारासाठी बेड मिळत नव्हते, तेव्हा तुम्ही कोणते होकायंत्र शोधत होता. तुमच्या आशिर्वादाने की शापाने एकत्र आलेले 'आमचं ठरलयं' वाले.. त्या काळात दडी मारुन बसले होते. 

तुमच्या राष्ट्रवादीच्या आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांना गरज होती. तेव्हा आम्हीच बेड उपलब्ध करुन दिले आहेत. राजकीय कटकारस्थाने करायला तुम्ही माणमध्ये आवश्य या, त्यासाठी तुमचे स्वागतच आहे. मात्र इथली जबाबदारी घ्यायचे पुण्यकर्म आपण कधीच केले नाही. एकतर तुम्हाला कुणीही मनापासून विचारत नाही. तुम्ही इथे आग लावून कांड्या पिकवण्याचे उद्योग करता असे तुमचेच पदाधिकारी खाजगीत बोलतात. तुम्ही आजपर्यंत पालकमंत्री, विधान परिषदेचे सभापती अशी आयुधे घेऊन इथे आलात आणि आमच्याशी लढलात. एकदा ही सगळी आयुधे बाजूला ठेवून मैदानात या, असे आव्हानही आमदार गोरे यांनी सभापती रामराजेंना दिले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख