जिहे- कटापूरसाठी 711 कोटी द्या : आमदार गोरेंची केंद्राकडे मागणी - Provide Rs 711 crore for Jihe-Katapur : MLA Gore's demand to the Center | Politics Marathi News - Sarkarnama

जिहे- कटापूरसाठी 711 कोटी द्या : आमदार गोरेंची केंद्राकडे मागणी

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

उरलेले 19 हजार 600 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी उर्वरित कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी 711.98 कोटींच्या निधीची गरज आहे. त्यामुळे या योजनेचा समावेश नाबार्डच्या 26 व्या मालिकेत करावा, अशी मागणी आमदार गोरे यांनी केली.

बिजवडी : माण, खटाव या दुष्काळी तालुक्‍यांना वरदान ठरणाऱ्या लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेचा रूरल  इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट फंड नाबार्डच्या पुढच्या मालिकेत समावेश करावा आणि उर्वरित कामांसाठी लागणारा 711.98 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी आमदार जयकुमार गोरे यांनी केंद्रीय अर्थ विभागाचे सचिव देबाशिष पांडा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून त्यांनी जिहे- कटापूरसह इतर विकासकामांना निधी देण्याविषयी चर्चा केली. नवी दिल्ली येथे केंद्रीय सचिव देबाशिष पांडा यांना दिलेल्या निवेदनात आमदार गोरे यांनी नमूद केले आहे, की माण आणि खटाव तालुक्‍यांतील 67 गावे ओलिताखाली आणणाऱ्या जिहे- कटापूर योजनेचा समावेश रुरल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट फंड नाबार्डच्या 23 व्या मालिकेत समावेश करण्यात आला होता.

त्या वेळी या योजनेसाठी 65 कोटींचा निधी मिळाला होता. दोन्ही दुष्काळी
तालुक्‍यातील 27,500 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आणणाऱ्या या योजनेच्या 1310 कोटींच्या खर्चाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. योजनेच्या एका उर्ध्वगामी नलिकेचे आणि बॅरेजचे काम जवळजवळ पूर्णत्वाला गेले आहे. एका नलिकेद्वारे योजना अंशत: सुरू करून 7900 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे.

उरलेले 19 हजार 600 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी उर्वरित कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी 711.98 कोटींच्या निधीची गरज आहे. त्यामुळे या योजनेचा समावेश नाबार्डच्या 26 व्या मालिकेत करावा, अशी मागणी आमदार गोरे यांनी केली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन आमदार
गोरेंनी मतदारसंघातील विकासकामांविषयी चर्चा केली. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख