तब्बल नऊ वर्षांनी पृथ्वीराज चव्हाणांची कराड पालिकेत एन्ट्री  - Prithviraj Chavan's entry in Karad Municipality after nine years | Politics Marathi News - Sarkarnama

तब्बल नऊ वर्षांनी पृथ्वीराज चव्हाणांची कराड पालिकेत एन्ट्री 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 14 एप्रिल 2021

वास्तविक 2016 मध्ये पालिकेच्या निवडणुकीत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या जाधव, यादव व उपाध्यक्ष पाटील यांच्या गटाने निवडणूक लढविली. लोकशाही व भाजप विरोधात होती. बहुमत जनशक्तीला मिळाले. मात्र निकालाच्या तिसऱ्याच दिवशी जनशक्तीने फारकत घेतली. ती आजही आहे.

कऱ्हाड : तब्बल नऊ वर्षांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड पालिकेत त्यांच्या निधीतून मिळालेल्या रूग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त एन्ट्री केली. श्री. चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यावेळी पालिकेत 2012 मध्ये ज्येष्ठ नेते (कै) पी. डी. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरणासाठी उपस्थित राहिले होते. त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी श्री. चव्हाण यांनी आज पालिकेत उपस्थिती लावली.

श्री. चव्हाण यांचा गट चार दिवसांपासून रूग्णवाहिकेवरून पालिकेत सक्रिय झाला होता. त्याच पार्श्वभूमिवर श्री. चव्हाण यांच्या पालिकेतील उपस्थितीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील यांच्यासह भाजपचे व लोकाशाहीचे सर्व नगरसेवक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वागताला उपस्थित होते.

जनशक्ती आघाडीतील राजेंद्र यादव, उपाध्यक्ष जयवंत पाटील यांच्या गटाने कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. वास्तविक 2016 मध्ये पालिकेच्या निवडणुकीत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या जाधव, यादव व उपाध्यक्ष पाटील यांच्या गटाने निवडणूक लढविली. लोकशाही व भाजप विरोधात होती. बहुमत जनशक्तीला मिळाले. मात्र निकालाच्या तिसऱ्याच दिवशी जनशक्तीने फारकत घेतली. ती आजही आहे.

यादव व उपाध्यक्ष पाटील यांचा गट विधानसभा निवडणुकीत चव्हाणांपासून अधिक दुरावला. काही मोजकेच नगरसेवक चव्हाण यांच्या सोबत होते. त्यामुळे पालिकेतील राजकारणाने तेंव्हापासून फिरकी घेतली. पालिकेला सलग दोन वर्षे स्वच्छ सर्वेक्षणचे देशपातळीवरील बक्षीस मिळाले. त्यावेळी चव्हाण यांनी पालिकेचे अभिनंदन केले.

मात्र पालिका अधिकारी किंवा सदस्यही त्यांच्यापर्यंत कधी पोचले नाहीत. त्यामुळे नगरसेवकांची ती दरी वाढली. आजच्या चव्हाणांच्या एन्ट्रीने नव्या राजकीय समीकारणांना निश्चित जन्म दिला आहे. विरोधी लोकशाहीसह जाधव गट, भाजपनेही स्वागताला हजेरी लावली. त्यामुळे त्याची चर्चा रंगली आहे. त्याशिवाय चव्हाण गाटाकडून इच्छुकांचीही भाऊ गर्दी पालिकेत झाली होती. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख