सातारच्या पोलिसांचे दातृत्व; चिमुकल्या श्लोकच्या शस्त्रक्रियेसाठी केली आर्थिक मदत - Philanthropy of Satar police; Financial aid for Little Shlok's surgery | Politics Marathi News - Sarkarnama

सातारच्या पोलिसांचे दातृत्व; चिमुकल्या श्लोकच्या शस्त्रक्रियेसाठी केली आर्थिक मदत

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

श्लोकवर उद्या (ता. ३०) शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या आदल्यादिवशी अचानक मिळालेली ही आर्थिक मदत पाहून बुधावले कुटुंबाला आधार मिळाला. तर आपली मदत वेळेवर कामाला आल्याचे पाहून या ग्रुपमधील पोलिसांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा : घरात खेळताना अचानक पेटलेल्या चुलीवर पडलेल्या श्लोक बुधावले या चार वर्षांच्या मुलावर शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रूपये खर्च येणार होता. बुधावले कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने हा खर्चाचा आकडा पाहून कुटुंबाच्या पायाखालची मातीच सरकली. पण, ही माहिती पोलिस दलातील २०१४ च्या बॅचच्या व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर पडली. या सर्व सदस्यांनी मदत करण्याचा निर्णय घेतला. एका दिवसांत ७६ हजार ५०० रूपये जमा झाले. ही जमा झालेली रक्कम पोलिसांनी श्लोकच्या  नातेवाईकांकडे जमा केली. अचानक मिळालेली ही आर्थिक मदत पाहून बुधावले कुटुंबाला आधार मिळाला. तर आपली मदत वेळेवर कामाला आल्याचे पाहून या ग्रुपमधील पोलिसांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोना महामारीने लोक त्रस्त झाली आहेत. त्यात संसर्ग रोखण्यासाठी शासनाने केलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय बंद आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या कुटुंबाला अचानक दवाखान्याचा खर्च करावा लागल्यास, असे कुटुंब हातबल होते. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीला तोंड देताना प्रत्येकजण आर्थिक अडचणीत आलेला आहे. अशा परिस्थितीत मदतीसाठी कोणाकडे हात पसरणार, हा प्रश्न निर्माण होतो. पण अशावेळी एखाद्याकडून अचानक आर्थिक मदत मिळते आणि कुटुंबाला आर्थिक हातभार मिळून ते आशावादी होते. अशीच घटना कराड तालुक्यातील म्हाप्रे येथे घडली आहे. 

म्हाप्रे (ता. कराड) येथील बुधावले कुटुंबातील चार वर्षांचा श्लोक हा घरात घेळत असताना पेटलेल्या चुलीवर पडला. या अपघातात तो गंभीरपणे भाजला आहे. अशा गंभीर परिस्थितीत त्याला तातडीने उपचार मिळणे गरजेचे होते. त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असून त्यासाठी दोन लाख रूपये खर्च येणार होता. पण, हॉस्पिटलचा हा खर्च बुधावले कुटुंबाला पेलवणारा नव्हता. घरची बेताची परिस्थिती आणि हातावरचे पोट त्यामुळे इतक्या मोठा खर्चाचा आकडा पाहून श्लोकच्या घरच्यांच्या पायाखालची मातीच सरकली. 

श्लोकच्या या अपघाताची माहिती सोशल मीडियावर फिरत होती. ही माहिती सातारा पोलिस दलातील २०१४ च्या बॅचच्या पोलिसांच्या व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर पडली. या ग्रुपवरील सर्व सदस्यांनी श्लोकला मदत करण्याचा निर्णय घेतला. बघता बघता या मुलाच्या उपचारासाठी आर्थिक मदत जमा होण्यास सुरवात झाली. एका दिवसांत ७६ हजार ५०० रूपये रोख जमा झाले. ही जमा झालेली रक्कम या ग्रुपच्या पोलिस सदस्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन श्लोकच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केली. 

श्लोकवर उद्या (ता. ३०) शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या आदल्यादिवशी अचानक मिळालेली ही आर्थिक मदत पाहून बुधावले कुटुंबाला आधार मिळाला. तर आपली मदत वेळेवर कामाला आल्याचे पाहून या ग्रुपमधील पोलिसांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या या दातृत्वाची सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात चर्चा असून त्यांचे सर्वस्तरातून कौतूक होऊ लागले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख