ईडीच्या प्रश्नावर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी दिले हे उत्तर.... - NCP leaders turned their backs on the District Bank award | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

ईडीच्या प्रश्नावर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी दिले हे उत्तर....

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 जुलै 2021

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, बँकेत पक्ष म्हणून कोणीही काम करत नाही. राजकिय विषय बाजूला ठेऊन सहकारी बँक म्हणून आम्ही सर्वजण एकत्र काम करतो.

सातारा : जरंडेश्वर कारखान्याला केलेल्या कर्जपुरवठ्याची माहिती जिल्हा बँकेकडून ईडीने मागविली आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत विचारली जाईल, यामुळे राष्ट्रवादीचा जिल्ह्यातील एकही संचालक जिल्हा बँकेच्या पत्रकार परिषदेस उपस्थित राहिला नाही. सर्व काही आमदार शिवेंद्रसिंहराजेंवर ढकलून रिकामे झाले. भाजप ईडीची चौकशी लावते का, या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजेंनी अधिक बोलणे टाळत याबाबत भाजप व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना विचारा, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. NCP leaders turned their backs on the District Bank award

सातारा जिल्हा बँकेला आज नाबार्डने पश्चिम महाराष्ट्रातील उत्कृष्ट कार्यक्षमते बद्दल 'बेस्ट परफॉर्मन्स' बँक म्हणून विशेष पुरस्काराने गौरविले. हा कार्यक्रम दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते झाला. यावेळी साताऱ्यातून ऑनलाइन पध्दतीने बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे तसेच संचालक शिवरूपराजे खर्डेकर, प्रकाश बडेकर, राजेश पाटील वाठारकर, अर्जूनराव खाडे, दत्तानाना ढमाळ, संचालिका सुरेखा पाटील, कांचन साळुंखे उपस्थित होते.

हेही वाचा : शाळांची घंटा अद्याप वाजणार नाहीच; आरोग्यमंत्र्यांचे संकेत..

पत्रकार परिषद सुरू होत असतानाच बँकेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने पालकमंत्र्यांनी सह्याद्री कारखान्यावर बोलावले आहे, असे सांगून निघून गेले. त्यानंतर पत्रकार परिषदेत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ईडीच्या नोटीसी विषयीची नेमकी माहिती दिली. ते म्हणाले, बँकेला ईडीची नोटीस आलेली नाही. तर जरंडेश्वर कारखान्याला बँकेने कर्जपुरवठा केलेल्याबद्दलची माहिती मागवली आहे.

आवश्य वाचा : अमित शहा सहकार मंत्री बनले अन्‌ भाजप नेत्यांकडून धमक्या देणे सुरू

त्यामुळे बँकेविषयी ठेवीदार व खातेदारांनी गैरसमज करून घेऊ नये. जरंडेश्वर कारखान्याला निकषात राहून कर्ज पुरवठा केलेला आहे. खासगी कारखाना म्हणून निकषात कुठेही जरंडेश्वरला डावलले नाही. बँकेने सहकारी पाच व खासगी दोन कारखान्यांना कर्जपुरवठा केलेला आहे. प्रचलित धोरणाप्रमाणे व रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या निकषाप्रमाणे कारखान्यांना कर्ज दिलेले आहे. बँकेकडे जरंडेश्वर कारखान्याची ४७२ कोटींची मुल्यांकन असलेली मालमत्ता ३० कोटींची साखर तारण आहे. त्यापैकी साखरेवर दिलेल्या कर्जाची कारखान्याने १५ कोटींची एकरकमी एकरकमी परतफेड केलेली आहे. 

भाजप ईडीचा गैरवापर करतेय असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे यांनी केला आहे, याविषयी विचारले असता आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, बँकेत पक्ष म्हणून कोणीही काम करत नाही. राजकिय विषय बाजूला ठेऊन सहकारी बँक म्हणून आम्ही सर्वजण एकत्र काम करतो. मी राष्ट्रवादीतून आमदार झाल्यानंतर बँकेचा अध्यक्ष झालेलो आहे. त्यानंतर मी भाजपमध्ये गेलेलो आहे. ईडीच्या विषयी तुम्ही राष्ट्रवादी व भाजपच्या प्रमुख नेत्यांना विचारा, मी अधिक काहीही सांगू शकत नाही, असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले. 

ईडीच्या चौकशीविषयी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारले जातील, यामुळे बँकेच्या आजच्या पुरस्कार मिळालेल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही दिग्गज संचालक बँकेच्या पत्रकार परिषदेस उपस्थित नव्हता. बँकेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील मानेही पत्रकार परिषद सुरू होत असतानाच पालकमंत्र्यांनी सह्याद्री कारखान्यावर बोलवले आहे, असे सांगून निघून गेले. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी अध्यक्ष म्हणून एकट्याने पत्रकारांना ईडीविषयीची माहिती दिली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख