राष्ट्रवादीचे माणचे नेते प्रभाकर देशमुखांना कोरोनाचा संसर्ग - NCP leader Prabhakar Deshmukh tested corona positive | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीचे माणचे नेते प्रभाकर देशमुखांना कोरोनाचा संसर्ग

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 9 ऑगस्ट 2020

श्री. देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी वेळीच स्वतःला होम क्वारंटाईन केल्यामुळे कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला कोरोनाची बाधा झालेली नाही. तसेच त्यांची तब्येत ही ठिक आहे.

दहिवडी : सेवानिवृत्त सनदी अधिकारी व राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख हे कोरोनाबाधित झाले आहेत. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात श्री. देशमुख हे माण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या खाजगी कार्यक्रमांसाठी तसेच भेटीगाठी घेण्यासाठी गावी आले होते. या दरम्यान, त्यांनी म्हसवड व दिवड येथे कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती. तसेच कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्यासंबंधी चर्चा केली होती.

त्यानंतर ते आपल्या एका सहकाऱ्यासोबत पुण्याला परत गेले होते. काही दिवसातच संबंधित सहकाऱ्याला त्रास जाणवू लागल्याने  त्यांची कोरोनाची चाचणी केली. दोन ऑगस्टला त्याचा तपासणीचा अहवाल कोरोना बाधित आला. त्यामुळे संबंधित सहकाऱ्याने याबाबत श्री. देशमुख यांना कल्पना दिली.

पुन्हा गावी निघत असलेल्या श्री. देशमुख यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले. तसेच पुढील दोन दिवसात स्वॅब तपासणीसाठी दिला. या तपासणीचा अहवाल सहा ऑगस्टला आला. यात श्री. देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. श्री. देशमुख यांनी वेळीच स्वतःला होम क्वारंटाईन केल्यामुळे कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला कोरोनाची बाधा झालेली नाही.

तसेच त्यांची तब्येत ही ठिक आहे. श्री. देशमुख यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची काळजी घ्यावी, तसेच कोरोनाबाबत काही लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

 "कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडवत असताना नकळतपणे मला कोरोनाने गाठले. सध्या माझ्यावर उपचार सुरु असून माझी तब्येत एकदम चांगली आहे. मी पुण्यात घरीच असून योग्य ती काळजी घेत आहे. त्यामुळे कोणीही घाबरुन जावू नये तसेच काळजी करु नये. लवकरच मी ठणठणीत बरा होवून पुन्हा एकदा नव्या जोमाने जनतेच्या सेवेत रुजू होईन." 
- प्रभाकर देशमुख (माजी सनदी अधिकारी, राष्ट्रवादीचे नेते)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख