उसण्या पैशावरून ग्रामपंचायत सदस्याचा खून; 12 तासांत संशयित पोलिसांच्या ताब्यात

दोघा संशयितांपैकी एकाने मंगेश यांच्या डोक्यात पाइपने मारहाण केली आणि दुसऱ्याने मंगेश यांच्या छातीमध्ये व पोटामध्ये धारदार शस्त्राने वार करून ठार मारले.
उसण्या पैशावरून ग्रामपंचायत सदस्याचा खून; 12 तासांत संशयित पोलिसांच्या ताब्यात
Murder of Gram Panchayat member on loan money; Two arrested from Chimangaon

कोरेगाव : गोगावलेवाडी (ता. कोरेगाव) ग्रामपंचायतीचे सदस्य मंगेश गणपत जाधव यांच्या खूनप्रकरणी चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. उसने दिलेले ३१ हजार रुपये वारंवार मागून देखील ग्रामपंचायत सदस्य मंगेश जाधव ते परत देत नसल्याच्या कारणावरून त्यांचा काटा काढल्याची कबुली दोघा संशयितांनी पोलिसांकडे दिली आहे. Murder of Gram Panchayat member on loan money; Two arrested from Chimangaon

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवानंद संजय गोरे (वय १८), कमलेश मधुकर यादव (वय १८, दोघेही रा. चिमणगाव, ता. कोरेगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. डोक्यात जखम असलेला मंगेश जाधव यांचा मृतदेह कुमठे गावाच्या हद्दीत धोम कालव्याच्या बाजूला शिवारात जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर काल दुपारी आढळून आला होता.

याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेनुसार उपअधीक्षक गणेश किंद्रे, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या अधिपत्याखाली सहायक निरीक्षक अर्चना शिंदे, उपनिरीक्षक विशाल कदम यांच्यासह पोलिस अंमलदारांचे तपास पथक तयार केले. या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाद्वारे या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या दोन संशयित युवकांना ताब्यात घेतले.

संशयितांकडे विचारपूस केली असता, त्यांनी मंगेश यांना ३१ हजार रुपये हातउसने दिले होते. वारंवार मागून देखील मंगेश ते परत देत नसल्याच्या कारणावरून दोघांनी त्यांचा काटा काढण्याचे ठरवले. बुधवारी (ता. चार) दोघा संशयितांनी मंगेश यांना कोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथून दुचाकीवरून कुमठे गावाच्या हद्दीतील धोम कॅनॉलच्या बाजूला शिवारातील कच्च्या रस्त्यावर नेले. तेथे दोघा संशयितांपैकी एकाने मंगेश यांच्या डोक्यात पाइपने मारहाण केली आणि दुसऱ्याने मंगेश यांच्या छातीमध्ये व पोटामध्ये धारदार शस्त्राने वार करून ठार मारले.

तेथून दुचाकीवरून दोघेही निघून गेल्याची कबुली संशयितांनी पोलिसांकडे दिली आहे. अशाप्रकारे १२ तासांच्या आत पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक निरीक्षक अर्चना शिंदे, संजय बोंबले, स्वप्नील धोंगडे, गणेश कड, प्रमोद सावंत, उपनिरीक्षक विशाल कदम, हवालदार कमलाकर कुंभार, प्रमोद चव्हाण, मिलिंद कुंभार, धनंजय दळवी, अमोल सपकाळ, सनी आवटे, साहिल झारी, सागर गायकवाड, सागर जाधव यांनी ही कारवाई केली आहे. संशयित देवानंद व कमलेश या दोघांनाही न्यायालयाने येत्या दहा तारखेपर्यंत पोलिस कोठडी दिली असून, निरीक्षक प्रभाकर मोरे तपास करत आहेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in