आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पत्नी वेदांतिकाराजेंसोबत जाऊन घेतली कोरोनाची लस - MLA Shivendraraje along with his wife Vedantikaraj took the corona vaccine | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पत्नी वेदांतिकाराजेंसोबत जाऊन घेतली कोरोनाची लस

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 22 मार्च 2021

लसीबाबत सोशल मीडियावर चुकीचे समज, गैरसमज आणि अफवा पसरवल्या जात आहेत. त्याकडे कोणीही लक्ष न देता लस घ्यावी आणि कोरोनापासून मुक्ती मिळवावी. 

सातारा : केंद्र आणि राज्य सरकारने कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांची पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांनी आज सातारा जिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोरोनावर मात करण्यासाठी शासनाच्या निकषात बसणाऱ्या सर्व जिल्हावासियांनी कोरोनावरील लस घ्यावी, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.  

आज (सोमवार) दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान, आमदर शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पत्नी सौ. वेदांतिकाराजेंसोबत जिल्हा रुग्णालयात गेले. त्याठिकाणी दोघांनीही कोरोनावरील लस घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, डॉ. कारंजकर, डॉ. देवकर, डॉ. दीपक थोरात, डॉ. राजगुरू, डॉ. जाधव, मेट्रन बोबडे मॅडम, परिचारिका रुबिना शेख, मिरासे आदी उपस्थित होते. 

लस घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून सर्वत्र हाहाकार उडाला आहे. अजूनही या महामारीची साथ आटोक्यात आलेली नाही. पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत.  
कोरोनापासून स्वतःचे व कुटुंबाचे आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे अत्यावश्यक आहे. शासनाच्या निकषास पात्र असणाऱ्या सर्व नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी आणि कोरोनाचे संकट थोपवण्यास हातभार लावावा.

 शासकीय आणि काही खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील लसीकरण सुरु करण्यात आले आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी लस घेणे काळाची गरज आहे. संपूर्ण लसीकरण झाले तरच कोरोना महामारीला पायबंद घातला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांनी लस घेतली असून लस घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

लसीबाबत सोशल मीडियावर चुकीचे समज, गैरसमज आणि अफवा पसरवल्या जात आहेत. त्याकडे कोणीही लक्ष न देता लस घ्यावी आणि कोरोनापासून मुक्ती मिळवावी. याशिवाय प्रत्येकाने मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा. वारंवार साबणाने हात धुवावेत तसेच सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करावे. या सर्व बाबी प्रत्येकाला माहिती आहेत. त्यामुळे विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये व गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी केले. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख