दहिवडी : ऑलिंपियन धावपटू ललिता बाबर यांची माणगावच्या (जि. रायगड) परिविक्षाधीन तहसीलदार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. माण तालुक्यातील मोही गावच्या सुकन्या असणाऱ्या ललिता बाबर यांनी आपल्या अंगभूत कौशल्य व जिद्दीच्या बळावर संपूर्ण जगात देशाची मान उंचावली आहे.
सुरुवातीला खो- खो खेळणाऱ्या ललिता बाबर यांच्यातील चपळपणा पाहून त्यांच्या शिक्षकांनी त्यांना धावण्याकडे वळविले. पंधराशे मीटर धावण्याच्या शर्यतीपासून सुरुवात करून त्यांनी मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. सलग तीनवेळा त्यांनी मुंबई मॅरेथॉन जिंकली आहे. मॅरेथॉननंतर त्यांनी अनेकांना नावही माहिती नसलेल्या 3000 मीटर स्टीपलचेस या खेळाकडे आपला मोर्चा वळवला.
या खेळातही त्यांनी आपला ठसा उमटविला. राष्ट्रीय विक्रम तर त्यांनी नोंदवलाच; पण जखमी असूनही रिओ दी जानरो येथे 2016 मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत पहिल्या दहामध्ये येण्याचा विक्रम केला. त्यांच्या खेळातील या योगदानाबद्दल त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीने (फिक्कीने) आणि भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने 2015 चा ''स्पोर्टस् पर्सन ऑफ दी ईयर'' हा पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता.
त्यामुळे राज्य शासनाने क्रीडा कोट्यातून त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड केली आहे. 29 सप्टेंबर 2019 पासून त्यांचे विविध ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहे. प्रत्यक्ष काम करण्यासाठी म्हणून त्यांची माणगावच्या परिविक्षाधीन तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नंतर त्यांची प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी म्हणून नेमणूक होईल. त्यानंतर त्यांना प्रांताधिकारी पदाचा पदभार देण्यात येईल. त्यांनी 27 नोव्हेंबरला माणगांवच्या तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला आहे.
"खेळाच्या मैदानावर देशाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची संधी मला मिळत आहे. या संधीचे सोने करण्याचा व जनतेची सेवा करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल.
- ललिता बाबर-भोसले (माणगाव तहसीलदार)

