किसन वीर कारखान्यात पवारांनी लक्ष घालणे आशादायक; कारभाराची चौकशी गरजेचीच 

कारखान्याच्या बेकायदा कारभाराबाबत गेल्या पाच-सहा वर्षांपासून आम्ही आवाज उठवत आहोत. अधिकचे कर्ज काढता यावे म्हणून सभासदांच्या परतीच्या ठेवी भागभांडवलात वर्ग करून ते फुगवण्याचा पराक्रम कारखान्याच्या व्यवस्थापनाने केला.
It is hopeful that Sharad Pawar will pay attention to the Kisan Veer factory
It is hopeful that Sharad Pawar will pay attention to the Kisan Veer factory

सातारा : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या एकूणच कारभाराची चौकशी कराच; त्याशिवाय कारखान्यावर ओढवलेले आर्थिक संकट नेमके मानवनिर्मित आहे की, साखर उद्योगाची परिस्थिती त्याला जबाबदार आहे हे लक्षात येणार नाही, अशी मागणी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब कदम, सभासद राजेंद्र शेलार, बाबूराव शिंदे, धर्मराज जगदाळे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली. 

किसन वीर कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पवार यांनी कारखान्याच्या एकूण परिस्थितीबाबत माहिती घेऊन यातून कोणत्या प्रकारे मार्ग निघू शकतो, याची चाचपणी चालवली आहे. अशी बैठक पुरेशा गांभीर्याने होणे आणि स्वतः श्री. पवार यांनी लक्ष घालणे, ही मोठी आशादायक आणि दिलासा देणारी बाब आहे. 

कारखान्याच्या बेकायदा कारभाराबाबत गेल्या पाच-सहा वर्षांपासून आम्ही आवाज उठवत आहोत. अधिकचे कर्ज काढता यावे म्हणून सभासदांच्या परतीच्या ठेवी भागभांडवलात वर्ग करून ते फुगवण्याचा पराक्रम कारखान्याच्या व्यवस्थापनाने केला. असे एक-दोन नव्हे, तर अनेक निर्णय बेकायदा असतानाही ते रेटून करण्याचा सपाटा चालवल्यामुळे आज तीनही कारखाने डबघाईस आले आहेत.

शेतकरी ऊस बिलासाठी, कामगार पगार व बोनससाठी तर इतर सर्व संबंधित घटक आपल्या जुन्या-नव्या येण्यासाठी चिंतातुर आहेत. दुसरीकडे कारखान्याचा ताळेबंद मात्र चलाखीने रंगवून सभासदांच्या डोळ्यांत धूळफेक सुरू आहे. याकडे आम्ही वेळोवेळी सभासदांचे लक्ष वेधले आहे. आता अशा आणीबाणीच्या परिस्थितीत कारखान्याची स्वतंत्रपणे, नि:पक्षपाती चौकशी होणे गरजेचे आहे.

त्याशिवाय नेमके दुखणे काय व ते किती विकोपाला गेले आहे, कर्ज नेमके किती, साखरेसह विविध उपपदार्थांची नेमकी निर्मिती किती, त्याची विक्री पद्धत कशी, यातून नेमके किती उत्पन्न अपेक्षित होते आणि नेमके आले किती आदी बाबींवर प्रकाश पडणार नाही. आमदार मकरंद पाटील यांनी अलीकडेच सहकारमंत्र्यांचे या प्रकरणी लक्ष वेधले होते.

विश्रामगृहावर त्यांना निवेदनही दिले होते; परंतु त्याचे पुढे काय झाले, याबाबत विचारणा बाकी असतानाच मुंबईत नुकतीच झालेली बैठक म्हणूनच दिलासा देणारी वाटते. सहकारमंत्र्यांनी आता धाडस दाखवावे. पक्षाध्यक्ष पवार यांचे तरी ऐकावे आणि तातडीने सक्षम अधिकाऱ्याद्वारे कारखान्याच्या कामकाजाची सखोल चौकशी करावी. याशिवाय आमचे अधिकचे आक्षेप आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे स्वतंत्रपणे नोंदवू. दरम्यान, आम्ही लवकरच श्री. शरद पवार यांची भेट घेऊन याप्रकरणी आणखी काही मुद्दे त्यांच्या निदर्शनास आणणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com