फलटण, सातारा, कऱ्हाडात कोरोनाचा कहर; आमदार, खासदारांकडून कोरोना हॉस्पिटलची उभारणी - The havoc of Corona in Phaltan, Satara, Karhada; Construction of Corona Hospital by MLAs, MPs | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

फलटण, सातारा, कऱ्हाडात कोरोनाचा कहर; आमदार, खासदारांकडून कोरोना हॉस्पिटलची उभारणी

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 28 एप्रिल 2021

सातारा, कराड व फलटण तालुके कोरोनाचा हॉटस्पॉट झालेले आहेत. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधींनी तातडीने उपाय योजनांवर भर देऊन  लोकांना बेड उपलब्ध व्हावेत, ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी राजघराण्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे.

सातारा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढला असून दिवसाकाठी १८०० च्यावर रूग्ण बाधित सापडत आहेत. यामध्ये सर्वाधिक रूग्ण सातारा, फलटण आणि कऱ्हाड तालुक्यात आहेत. राजघराण्याचे वर्चस्व असलेल्या सातारा व फलटण तालुक्यात सर्वाधिक रूग्ण सापडले आहेत. सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले व माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदारसंघातील जनतेला वाचविण्यासाठी तातडीने कोरोना केअर सेंटर उभारली आहेत. तर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तर ऑक्सिजन प्लँट लोणंदमध्ये सुरू करून जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण केली आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सातारा जिल्ह्यात रूग्णसंख्या वाढीचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात १८०० च्यावर रूग्ण सापडले आहेत. मृत्यूचे प्रमाण ही ३४ ते ३५ रूग्ण प्रतिदिवस असे राहिले आहे. मृत्यूचा दर कमी झाला असला तरी बाधितांचा आकडा कमीजास्त होत आहे. आतापर्यंत सातारा तालुक्यात २२ हजार ६७४, कऱ्हाडमध्ये १५ हजार २२२, फलटण तालुक्यात १२ हजार ३५१ रूग्ण सापडले आहेत.

सातारा, कराड व फलटण तालुके कोरोनाचा हॉटस्पॉट झालेले आहेत. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधींनी तातडीने उपाय योजनांवर भर देऊन  लोकांना बेड उपलब्ध व्हावेत, ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी राजघराण्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वतःच्या मंगल कार्यालयात कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे.

तर सभापती रामराजे नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणचे माजी नगराध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन कोविड सेंटर सुरू केली आहेत. सभापती रामराजेंनी लोणंद येथील सोना अलाइज या कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्याची गरज भागेल एवढा ऑक्सिजन निर्मिती प्लँट सुरू केला आहे.

तसेच माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. कऱ्हाडमधील रूग्णांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी सह्याद्री कारखान्यावर कोरोना हॉस्पिटल उभारले असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोना केअर सेंटरच्या माध्यमातून रूग्णांना बेड उपलब्ध करून दिले आहेत. 

तालुकानिहाय आज सापडलेले बाधित व आतापर्यंत सापडलेले बाधित रूग्ण असे आहेत. जावली 77 (4627), कराड 202 (15222), खंडाळा  101 (6036), खटाव 200 (8450), कोरेगांव 139 (8224),माण 90 (5681), महाबळेश्वर 69 (3258), पाटण 73 (3994), फलटण 217 (12351), सातारा 507 (22674), वाई 114 (7499 ). आजअखेर एकूण 98 हजार 532  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख