`गोकुळ`ची निवडणूक रंगात... पण सर्वोच्च न्यायालयात वाद गेल्याने पुन्हा संभ्रम - Gokul's election on a different path ... but confusion again after a dispute in the Supreme Court | Politics Marathi News - Sarkarnama

`गोकुळ`ची निवडणूक रंगात... पण सर्वोच्च न्यायालयात वाद गेल्याने पुन्हा संभ्रम

निवास चौगुले
मंगळवार, 20 एप्रिल 2021

सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी पुकारण्यात आली आहे. त्यातच एका ठराव धारकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून "गोकुळ'चे 50 ते 60 ठरावदारांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर 26 एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीबाबत उत्सुकता आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीबाबत राज्य सरकारने 26 एप्रिलपूर्वी म्हणणे सादर करावे, असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जोसेफ व न्यायमूर्ती लतीफ यांच्या खंडपीठाने दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी 26 एप्रिल रोजी होणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील 41 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. तथापि उच्च न्यायालयाच्या 10 फेब्रुवारीच्या आदेशानुसार "गोकुळ'ची प्रक्रिया सुरू असून, या निवडणुकीसाठी दोन मे रोजी मतदान होत आहे.

दरम्यानच्या काळात "गोकुळ'च्या निवडणुकीलाही स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका दोन संस्थांतर्फे सर्वोच्च न्यायालयात 12 मार्च रोजी दाखल केली होती. वेगवेगळ्या कारणांनी त्यावरील सुनावणी लांबली होती. आज ही याचिका सुनावणीसाठी आली असताना न्यायालयाने राज्य सरकारला याप्रकरणी म्हणणे सादर करण्याचे आदेश देत पुढील सुनावणी 26 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली

.या निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस आहे. त्यानंतर दोन्हीही आघाड्यांचे चित्र स्पष्ट होईल. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी पुकारण्यात आली आहे. त्यातच एका ठराव धारकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून "गोकुळ'चे 50 ते 60 ठरावदारांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर 26 एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीबाबत उत्सुकता आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख