जिल्हा बॅँकेत काँग्रेसला सन्मानाने जागा द्या, अन्यथा स्वतंत्र पॅनेल... - Give Congress a respectable seat in the District Bank, otherwise an independent panel ... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

जिल्हा बॅँकेत काँग्रेसला सन्मानाने जागा द्या, अन्यथा स्वतंत्र पॅनेल...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 21 ऑगस्ट 2021

पराभवाचा सामना करावा लागला तरी चालेल, अशा भूमिकेत सध्या काँग्रेसचे नेते आहेत. त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितसिंह देशमुख, विराज शिंदे, रतन शिंदे, मनोहर बर्गे आदींनी रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे.

सातारा : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने वेगळीच भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सन्मानाने एक ते दोन जागा देण्याची तयारी दर्शविली तर ठिक, अन्यथा काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी खटाव, कोरेगाव, कऱ्हाड, वाई तालुक्यांसह दोन संस्था मतदारसंघातून जुळवाजुळव केलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पॅनेल करताना काँग्रेसला विचारात घ्यावे लागणार आहे. Give Congress a respectable seat in the District Bank, otherwise an independent panel ...

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी यावेळेस सर्वच पक्ष सक्रिय झाले आहेत. पण, ही निवडणूक सर्वांच्या सहकार्याने बिनविरोध करण्याची भूमिका राष्ट्रवादीची आहे. पण, त्यांना महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सामावून घ्यायचे नाही. त्यामुळे प्रत्येक जण राष्ट्रवादीवर दबावतंत्र अवलंबून जिल्हा बॅंकेत आपल्या पक्षाचा संचालक कसा होईल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. 

हेही वाचा : बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणाऱ्या पडळकरांसह 41 जणांवर गुन्हे

अगदी स्थापनेपासून जिल्हा बॅंक ही काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहिली. यामध्ये किसन वीर आबांच्या नंतर काँग्रेसचे नेते (कै.) विलासराव पाटील-उंडाळकरांनी बॅंकेची धुरा सांभाळली. सर्वाधिक कालावधीत त्यांच्याच नेतृत्वाखाली बॅंकेची वाटचाल राहिली. त्यांनी बॅंक उत्तम प्रकारे चालवली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या संचालकांनी बॅंक ताब्यात घेतली. त्यावेळीही विलासराव पाटील-उंडाळकर व आमदार जयकुमार गोरे हे दोघे काँग्रेसचे संचालक राहिले. पण, आमदार गोरे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला. तर विलासराव पाटील-उंडाळकर यांचे निधन झाले. 

आवश्य वाचा : चंद्रकांतदादांच्या इशाऱ्याने नितीन लांडगेंसह भाजपच्या १० सदस्यांच्या पोटात गोळा

त्यांच्या पश्चात आता त्यांचे चिरंजीव ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना बॅंकेवर संचालक म्हणून घ्यावे, अशी अपेक्षा कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांची आहे, तशीच काँग्रेसच्या नेत्यांचीही आहे. पण, राष्ट्रवादीकडून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना कऱ्हाड विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून बॅंकेवर संचालक म्हणून निवडून यायचे असल्याने या मतदारसंघातून इच्छुक असूनही उदयसिंह पाटील यांना येता येणार नाही. तर दुसरा मतदारसंघ बॅंका- पतसंस्थांचा आहे. पण, त्यालाही राष्ट्रवादीकडून दुजोरा मिळत नाही. 

काँग्रेसच्या माध्यमातून खटाव, कऱ्हाड, कोरेगाव, वाई, तसेच बॅंका, पतसंस्था तसेच गृहनिर्माण आणि पाणीपुरवठा मतदारसंघातून उमेदवार देण्याची तयारी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने सर्वसमावेशक पॅनेल करताना काँग्रेसला विचारात घेऊन सन्मानाने एक-दोन जागा द्याव्यात, अशी अपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांची आहे. यामध्ये डावलण्याचा प्रयत्न झाल्यास काँग्रेस पक्ष सर्व मतदारसंघांत उमेदवार देऊन स्वतंत्र पॅनेल टाकण्याचीही तयारी करणार आहे. 

मग यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला तरी चालेल, अशा भूमिकेत सध्या काँग्रेसचे नेते आहेत. त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितसिंह देशमुख, विराज शिंदे, रतन शिंदे, मनोहर बर्गे आदींनी रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. काँग्रेसच्या मागणीवर राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते काय भूमिका घेणार, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून आहे. 

'जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत काँग्रेसला सन्मानाने सामावून घेऊन संचालकांच्या योग्य जागा दिल्या जाव्यात, अन्यथा काँग्रेस पक्ष या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल उभे करेल. यासाठी आमची कोरेगाव, वाई, कऱ्हाड, खटाव, तसेच इतर दोन संस्था मतदारसंघांतून तयारी झाली आहे.' 

-डॉ. सुरेश जाधव (प्रभारी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस) 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख