सरपंच जावयाच्या मदतीला धावले माजी मंत्री ! - Former minister rushed to Sarpanch's aid! | Politics Marathi News - Sarkarnama

सरपंच जावयाच्या मदतीला धावले माजी मंत्री !

संजय जगताप
शनिवार, 20 मार्च 2021

तोडगा काढण्यासाठी माजी मंत्री बसवराज पाटील यांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचेशी संपर्क साधला. सविस्तर माहिती देऊन चर्चा केली. खंडीत केलेला पाणी योजनेचा वीजपुरवठा तात्काळ जोडण्यासंदर्भात विनंती केली.

मायणी : थकित वीज बिलापोटी महावितरणने मायणी प्रादेशिक पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईची माहिती सरपंच सचिन गुदगे यांनी त्यांचे सासरे, माजी मंत्री बसवराज पाटील यांना दिली. पाटील यांनी थेट राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचेशी संपर्क साधून गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर मंत्री राऊत यांनी पूर्ववत वीज जोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला.

त्याबाबत सचिन गुदगे म्हणाले, मायणी प्रादेशिक योजनेचे सुमारे सव्वातीन कोटी वीज बिल थकित आहे. त्यापैकी दोन लाख रुपये ग्रामपंचायतीने भरले आहेत. तरीही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पाणी योजनेची वीज खंडित केली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात तीव्र टंचाई निर्माण झाली. पाण्यासाठी नागरिकांची धावपळ होऊ लागली.

दरम्यान, निर्माण झालेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती गुदगे यांनी त्यांचे सासरे, काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांना दिली. तसेच मायणीसह पाच गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे बिल आम्ही सत्तेवर येण्याआधीपासूनचे आहे. नुकतेच दोन लाख रुपये बिल ग्रामपंचायतीने भरले आहे. थकबाकीची रक्कम मोठी असल्याने ती पूर्ण भरणे अशक्य आहे.

वीज बिल परवडत नसल्याने प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील सहभागी चितळी, मोराळे, गुंडेवाडी व मरडवाक या ग्रामपंचायती बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे योजनेच्या पूर्ण बिलाचा बोजा एकट्या मायणी ग्रामपंचायतीवर पडत आहे. परिणामी योजना चालवणे जिकिरीचे झाले आहे. असे गाऱ्हाणे मांडले. त्यावर तोडगा काढण्यासाठी माजी मंत्री बसवराज पाटील यांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचेशी संपर्क साधला. सविस्तर माहिती देऊन चर्चा केली. खंडीत केलेला पाणी योजनेचा वीजपुरवठा तात्काळ जोडण्यासंदर्भात विनंती केली.

त्यानुसार मंत्री महोदयांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या. त्यामुळे वीज जोडण्याची कार्यवाही तातडीने झाली आणि पाणीपुरवठाही पूर्ववत सुरळीत झाला. असे सचिन गुदगे यांनी सांगितले. दरम्यान, विविध भागातील पाणी पुरवठा पुन्हा सुरू झाल्यामुळे, टंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सरपंच असलेल्या सचिन गुदगें या जावयाच्या मदतीसाठी माजी मंत्री असलेले सासरे बसवराज पाटील धावून आल्यामुळेच अपेक्षेपेक्षा लवकर पाणी पुरवठा सुरळीत झाला असल्याची चर्चा ठिकठिकाणी होत आहे.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख