जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात मारामारी; अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच खुर्च्या फेकून मारल्या - Fights in the office of the Jivan Pradhikaran; Officers, employees threw chairs | Politics Marathi News - Sarkarnama

जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात मारामारी; अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच खुर्च्या फेकून मारल्या

रविकांत बेलोशे
शनिवार, 20 मार्च 2021

पाचगणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने नागरिकांना पाण्यावाचून पळापळ करावी लागत आहे. भरमसाठ बिले, अवाजवी रीडिंग, पाण्याची बोंबाबोंब यामुळे पाचगणीमधील ग्राहक अक्षरशः या कारभाराला वैतागले आहेत.

भिलार : पाचगणी या पर्यटनस्थळांवर पाण्यासाठी लोक टाहो फोडत असताना दुसरीकडे मात्र, समस्या सोडविण्यावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात काल हमरी तुमरी.. होऊन तुंबळ मारामारी झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 

याबाबत माहिती अशी, की गेले चार दिवस पाचगणीच्या एका भागाला पाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांनी तक्रारींचा पाढा कार्यालयात जाऊन वाचला. परंतु, या समस्येवर तोडगा काढण्याऐवजी वरिष्ठ अभियंता आणि कर्मचारी यांच्यात तू तू मैं मैं.. होऊन वादाला तोंड फुटले. एकमेकांतील वाद विकोपाला गेला.

एकमेकांवर धावून जाण्यापर्यंत मजल गेली आणि शेवटी कार्यालयातील खुर्च्या एकामेकांच्या अंगावर फेकून तुंबळ मारामारी झाली. या निमित्ताने पाचगणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने नागरिकांना पाण्यावाचून पळापळ करावी लागत आहे. भरमसाठ बिले, अवाजवी रीडिंग, पाण्याची बोंबाबोंब यामुळे पाचगणीमधील ग्राहक अक्षरशः या कारभाराला वैतागले आहेत.

त्यातच अशा घटनांमुळे कार्यालयातील अंतर्गत धुसफूस बाहेर आल्याने याबाबत कार्यालय व अधिकाऱ्यांची नाचक्की होत आहे. याबाबत ग्राहकांनी मात्र या घटनेचा वेध घेत ग्राहकांना वेळेवर पाणी देण्याचे काम असताना ते काम बाजूला ठेवून अशी वादावादी करून उलट ग्राहकांना हे अधिकारी आणि कर्मचारी वेठीस धरत आहेत.

त्यामुळे अशा भांडखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करावा अथवा बदली करून चांगले कर्तव्यनिष्ठ कर्मचारी पाठवावेत, अशी मागणी ग्राहक राजू काकडे यांनी केली आहे. याबाबत संबंधित अभियंत्यांना विचारले असता त्यांनी ही घटना घडली नसल्याचे सांगितले आहे. परंतु, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की मी कर्मचारी आहे. अधिकाऱ्यांनी मला कामाव्यतिरिक्त कसेही बोलणे योग्य नाही. याबाबत मी माझ्या वरिष्ठांना
लेखी माहिती देत असल्याचे सांगून या घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र, याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यात कसलीही नोंद झालेली नाही.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख