कोरोनाला घाबरू नका; लक्षणे दिसताच तातडीने कोरोना चाचणी करा : शिवेंद्रसिंहराजे - Don't be afraid of Corona; Test corona as soon as symptoms appear: Shivendraraje | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाला घाबरू नका; लक्षणे दिसताच तातडीने कोरोना चाचणी करा : शिवेंद्रसिंहराजे

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

लक्षणे असतानाही अनेकजण घरीच बसून दुखणे अंगावर काढतात. यामुळे ते स्वतःच्या आणि घरातील वृद्ध आई- वडील, पत्नी, मुले आदी कुटुंबियांच्या जीवाशी खेळत असतात.

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून सातारा शहरासह जिल्ह्यात गंभीर परिस्थिती आहे. कोणीही घाबरून न जाता ताप, सर्दी, खोकला आदी कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित कोरोनाची टेस्ट करून घ्यावी. दुखणे अंगावर काढल्यास जीवावर बेतण्याचा धोका असून कोणीही कोरोनाबाबत हलगर्जीपणा करून स्वतःसह कुटुंबियांचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असे कळकळीचे आवाहन साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

यासंदर्भात शिवेंद्रसिंहराजेंनी दिलेल्या पत्रकात म्हटले की, कोरोना महामारीचा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. प्रशासनाकडून उपाययोजना सुरु असल्या तरी या महामारीला अटकाव करण्यासाठी प्रत्येकानेच जबाबदारीने वागले पाहिजे. कोरोना हा बरा होणारा आजार आहे. त्यामुळे घाबरून जाऊन अथवा मला काय होतंय असं समजून दुखणे अंगावर काढण्याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.

अगदी जीवावर बेतल्यानंतर रुग्ण उपचारासाठी दाखल होतात आणि मग वेळ निघून गेलेली असते, अशी संख्या खूप पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोना आजारासंबंधी ताप, खोकला, सर्दी आदी कोणतेही लक्षण दिसल्यास तातडीने कोरोनाची टेस्ट करून घेणे आणि त्यावर उपचार सुरु करणे आवश्यक आहे. मगच पुढील धोका टळणार आहे. 

लक्षणे असतानाही अनेकजण घरीच बसून दुखणे अंगावर काढतात. यामुळे ते स्वतःच्या आणि घरातील वृद्ध आई- वडील, पत्नी, मुले आदी कुटुंबियांच्या जीवाशी खेळत असतात. ही बाब अतिशय गंभीर असून एखादे लक्षण जरी जाणवले तरी टेस्ट करून घ्यावी. घरी बसून आपल्याला काहीही होणार नाही या भ्रमात राहून स्वतःचा आणि इतरांचा जीव कोणीही धोक्यात घालू नये. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहावे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख