खंडाळा कारखाना वाचविण्यासाठी संचालकांचे पृथ्वीराज चव्हाणांना साकडे - Director runs to Prithviraj Chavan to save Khandala sugar factory | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खंडाळा कारखाना वाचविण्यासाठी संचालकांचे पृथ्वीराज चव्हाणांना साकडे

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 एप्रिल 2021

आम्ही खंडाळ्याचे सर्व शेतकरी, सभासद यासंदर्भात जे काही रीतसर कायदेशीर आर्थिक देणे आहे, ते परत करायला तयार आहोत; परंतु "किसन वीर'चे अध्यक्ष मदन भोसले यांच्या मनात वेगळेच काही शिजत आहे.

सातारा : किसन वीर खंडाळा साखर उद्योग हा सहकारातील भागीदारीचा अनोखा प्रयोग आहे. तो आता अडचणीत आलेला असताना ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष घालून तो खंडाळ्याच्या शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन खंडाळा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, संचालक राजेंद्र तांबे, चंद्रकांत ढमाळ आदींनी केले आहे. 

यासंदर्भात खंडाळा कारखान्याचे उपाध्यक्ष व्ही. जी. पवार म्हणाले, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना आणि खंडाळा शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्या दरम्यान भागीदारीचा करार होताना मुख्यमंत्रिपदी पृथ्वीराज चव्हाण होते. सातारा जिल्ह्यातील या नवीन सहकार पर्वाचे महत्त्व लक्षात घेऊन हा करार होण्यास पृथ्वीराज चव्हाण यांचा सर्वतोपरी पाठिंबा होता; किंबहुना त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्‍यच नव्हते.

आज हा उद्योग विशेषत: खंडाळा कारखान्याच्या अस्तित्वालाच बॅंकेच्या जप्ती नोटिशीमुळे आव्हान मिळाले आहे. आम्ही खंडाळ्याचे सर्व शेतकरी, सभासद यासंदर्भात जे काही रीतसर कायदेशीर आर्थिक देणे आहे, ते परत करायला तयार आहोत; परंतु "किसन वीर'चे अध्यक्ष मदन भोसले यांच्या मनात वेगळेच काही शिजत आहे.

या अडचणीतही ते आपल्यासाठी संधी शोधत असून, तिसरा भागीदार आणू इच्छितात; परंतु आम्ही हे होऊ देणार नाही. यासंदर्भात आम्ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशीही भेटून चर्चा केली आहे. आमची ही कैफियत कानी घालण्यासाठी आम्ही नुकतीच पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. शिवाय आम्ही बहुसंख्य संचालकांनी यासंदर्भात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि साखर आयुक्त, सहकार आयुक्त आदींना निवेदनही सादर केले आहे. 

शक्‍य ते सर्व करू : चव्हाण 
पृथ्वीराज चव्हाण यांनीही सर्व कायदेशीर आणि सहकारी नियमांची माहिती घेऊन यासंदर्भात खंडाळा तालुक्‍यातील शेतकरी सभासदांसाठी जे काही करता येईल ते जरूर करू, अशी ग्वाही आम्हाला दिली आहे, असेही व्ही. जी. पवार यांनी सांगितले. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख