आमदार महेश शिंदेंच्या माध्यमातून कोरेगावात 29 कोटींची विकासकामे - Development works worth Rs 29 crore in Koregaon through MLA Mahesh Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार महेश शिंदेंच्या माध्यमातून कोरेगावात 29 कोटींची विकासकामे

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 4 मे 2021

  पोकळ घोषणाबाजी न करता आमदार महेश शिंदे यांनी मंजूर करून घेतलेली विकासकामे प्रत्यक्षात सुरू करून ती दर्जेदार होण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

कोरेगाव : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव शहरात अवघ्या पावणेदोन वर्षांत 29 कोटींची विकासकामे मार्गी लागली आहेत. त्यापैकी सात कोटींची कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत. पोकळ घोषणाबाजी न करता आमदार महेश शिंदे यांनी मंजूर करून घेतलेली विकासकामे प्रत्यक्षात सुरू करून ती दर्जेदार होण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, अशी माहिती कोरेगावचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक राजाभाऊ बर्गे यांनी दिली आहे.

 राजाभाऊ बर्गे म्हणाले, अनेक वर्षे रखडलेली कामे हाती घेऊन ती दर्जेदार व टिकाऊ होण्यासाठी त्यावर आम्ही देखरेख ठेऊन आहोत. आमदार महेश शिंदे यांनी या विकासकामांची पाहणी करून आवश्‍यक तेथे बदल करण्याच्या सूचना बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिल्या आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांनी कोणतेही विकासाचे काम केले नाही. राजकारणापलीकडे त्यांनी शहरात ठोस काही केले नाही.

दुसरा कोणी काम करत असल्यास विरोध करून ते हाणून पाडण्याचे आणि स्वत:चा मोठेपणा मिरवण्याचे धोरण त्यांनी राबवल्याचे बर्गे यांनी सांगितले. महेश शिंदे यांनी कोरोनाच्या काळातही 22 कोटींची विकासकामे मंजूर करून आणली असून, तीही लवकरच सुरू होणार आहेत.

सध्या मंजूर केलेल्या कामांमध्ये कोरेगाव शहरात भिलारे कॉर्नर- रामलिंग रोड- बुरुडगल्ली- व्यापार पेठ- चौथाई परिसरात भुयारी गटारे आणि ट्रिमिक्‍स काँक्रिटीकरण रस्ते (तीन कोटी पाच लाख), याशिवाय शहराच्या विविध भागांतील ट्रिमिक्‍स कॉंक्रिटीकरण रस्त्यांकरिता देसाई पेट्रोल पंप ते कन्याशाळा रस्ता (30.5 लाख).

तसेच शांतीनगरमधील सागर दोशी घर ते रहिमतपूर रस्ता आणि श्रीकांत बर्गे घर ते रहिमतपूर रस्ता (65 लाख), गोसावी वस्ती ते अरुण बर्गे यांच्या घरापर्यंत रस्ता आणि भगवा चौक ते अयोध्या कॉलनी रस्ता (प्रत्येकी 40 लाख), लक्ष्मीनगरमधील गोसावी हॉस्पिटलसमोरील रस्ता (दोन कोटी 20 लाख), असा एकूण सात कोटींचा निधी मंजूर झाला आहे. 
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख