सहकार मंत्र्यांच्या तालुक्यातील बँकेचा परवाना आरबीआयने केला रद्द  - The banking license of Karad Janata Sahakari Bank was canceled by the RBI Today | Politics Marathi News - Sarkarnama

सहकार मंत्र्यांच्या तालुक्यातील बँकेचा परवाना आरबीआयने केला रद्द 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

 कऱ्हाड  पोलिसात जनता बँकेच्या संचालक मंडळासह काही
अधिकाऱ्यांवर तब्बल 310 कोटींच्या अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. तोही गुन्हा पोलिस तपासावर आहे. 2017 ते 2019 या निर्बंधाच्या काळात बँकेने केलेले काम नियमबाह्य होते. रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आल्यानतंर बँकेचा बँकिंग परवानाच रद्दचा आदेश दिला आहे. 

कऱ्हाड : सहकार क्षेत्रात नावाजलेल्या कऱ्हाड जनता सहकारी बॅंकेचा बॅंकिग परवाना रिझर्व्ह बँकेने आज रद्द केला. त्याबाबतचे आदेश आज येथे प्राप्त झाल्याने ठेवीदार, सभासदांत खळबळ उडाली. रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर सहकार आयुक्तांनी बँकेची दिवाळखोरी जाहीर करत बँक अवसायनात गेल्याचे जाहीर केले आहे. बँकेवर उपनिंबधक मनोहर माळी यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली आहे. ही बँक राष्ट्रवादीचे नेते राजेश पाटील वाठारकर यांची असून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हेही कऱ्हाड तालुक्यातील असूनही राष्ट्रवादीच्या नेत्याची बँक ते वाचवू शकलेले नाहीत. 

सातारा जिल्ह्यावर राष्ट्रवादीची सत्ता असून राष्ट्रवादीचे नेते राजेश पाटील वाठारकर यांची ही बँक आहे. यापूर्वी राजेश पाटील वाठारकर यांनी पदवीधरमधून दोनदा निवडणुक लढविली होती. तर त्यांचे वडील विलासराव वाठारकर हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते. तसेच ते जिल्हा बँकेवर पतसंस्था गटातून निवडून आले होते. १९९८-९९ मध्ये कऱ्हाड दक्षिणमधून विलासराव पाटील उंडाळकरांविरोधात त्यांनी निवडणुक लढली होती.

सध्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे कऱ्हाड तालुक्यातीलच असून ते राष्ट्रवादीच्या नेत्याची अवसायानात जाणारी बँक ते वाचवू शकलेले नाहीत. जनता सहकारी बँकेच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे 29 शाखा व 32 हजार सभासद आहेत. उपनिंबधक मनोहर माळी यांनीही याला दुजोरा दिला आहे.

श्री. माळी म्हणाले, कऱ्हाड जनता सहकारी बँकेचा बँकींग परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे. त्याचे आदेश काल रात्री उशीरा पारीत झाले आहेत. बँकेतही त्याची स्थळप्रत लावण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशानुसार बँकेत पाच लाखांच्या आतील ठेवीदारांचे पैसे परत केले जाणार आहेत. त्याला किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

बँकेच्या दोन विस्तारीत कक्षासह 29 शाखा आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे त्या विस्तारलेल्या आहेत. त्या सगळ्याच संस्थाचे कामकाज बंद राहणार आहे. रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर आता सहकार आयुक्तांनी कऱ्हाड जनता बँक अवसायानात गेल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी अवसायक म्हणून माझीच नेमणूक केली आहे. 

कऱ्हाड जनता बँकेवर नोव्हेंबर 2017 मध्ये रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आले. त्यानंतर सहा ऑगस्ट 2019 मध्ये बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक झाली. त्यानंतरच्या कालावधीत संचालक मंडळाच्या अनेक गोष्टी बाहेर आल्या. निर्बंधाच्या कालवधीतच बँकेचे सभासद आर. जी. पाटील यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीवर पोलिस तपासाचे आदेश झाले.

त्यानुसार कऱ्हाड  पोलिसात जनता बँकेच्या संचालक मंडळासह काही
अधिकाऱ्यांवर तब्बल 310 कोटींच्या अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. तोही गुन्हा पोलिस तपासावर आहे. 2017 ते 2019 या निर्बंधाच्या काळात बँकेने केलेले काम नियमबाह्य होते. रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आल्यानतंर बँकेचा बँकिंग परवानाच रद्दचा आदेश दिला आहे. 

 

सामान्य सभासदांची बँक केवऴ चुकीच्या कारभारामुळे दिवाळखोरीकडे निघाली आहे. बँकेत अपहार कोणी केला. परवाना रद्द होण्यास कोण
जबाबदार आहे. याची चौकशी होत नाही. तोपर्र्ंत बॅकेच्या विरोधात लढा चालूच ठेवणार आहे. कोर्टात जे खटले आहेत. तेही तितक्याच
ताकदीने लढवून न्याय मिळेपर्यंत लढा कायम ठेवणार आहे.

- आर. जी. पाटील (फिर्यादी व सभासद कऱ्हाड जनता बँक)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख