चिंता वाढली : साताऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी सापडले सातशे रूग्ण - Anxiety increased: Seven hundred patients found in Satara for second day in a row | Politics Marathi News - Sarkarnama

चिंता वाढली : साताऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी सापडले सातशे रूग्ण

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 3 एप्रिल 2021

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आढावा बैठक घेऊन कोरोनाची उपाय योजना न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना केली आहे. तसेच बेड कमी पडू नयेत यासाठी कोरोना केअर सेंटर ही सुरू करण्याची सूचना करण्यात आली आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. गुरूवारी मध्यरात्रीपर्यंत ७४२ तर शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ७०३ बाधित रूग्ण आढळले आहेत. यामध्ये सातारा व फलटण तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनल्याचे चित्र आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चाचणी वाढविण्यासोबतच सोमवार (ता. ५) पासून जिल्ह्यातील ३२९ आरोग्य उपकेंद्रांवर लसीकरण मोहित सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रात्री आठ ते सकाळी सात जमावबंदी आदेश लागू केले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. पुणे व मुंबईशी संपर्क असलेला जिल्हा असल्याने पुणे व मुंबई पाठोपाठ साताऱ्यानेही कोरोना बाधित रूग्णांमध्ये आघाडी घेतली आहे. गुरूवार व शुक्रवार असे दोन दिवस १४४५ बाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले असून रात्री आठ ते सकाळी सात यावेळेत जमावबंदी आदेश लागू केल आहेत.

तसेच कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यासोबतच कोरोना केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यासाठीची उपाय योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ५००७ कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत १९१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. तसेच ६० हजार ५७५ रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केलेली आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.

शुन्यावरून पुन्हा दोन ते चार मृत्यू होण्यापर्यंत आकडा गेला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आढावा बैठक घेऊन कोरोनाची उपाय योजना न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना केली आहे. तसेच बेड कमी पडू नयेत यासाठी कोरोना केअर सेंटर ही सुरू करण्याची सूचना करण्यात आली आहे.

यासोबतच आरोग्य विभागाने येत्या सोमवार (ता. ५) पासून जिल्ह्यातील ३२९ उपकेंद्रांवर कोरोना लसीकरण करण्याची तयारी केली आहे. यामध्ये ४५ वर्यागटावरील दररोज शंभर जणांना लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी जादा लसीची मागणी केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता नागरीकांची साथ प्रशासनाला हवी आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख