आनंदराव पाटलांचा विधान परिषदेचा निधी कोविड लढ्यासाठी  - Anandrao Patil's last fund of the Legislative Council for Covid fight | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

आनंदराव पाटलांचा विधान परिषदेचा निधी कोविड लढ्यासाठी 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 17 मार्च 2021

गावोगाव कोरोनाचे रूग्ण आढळत असल्याने ग्रामपंचायतींना सतर्कता बाळगावी लागत आहे. ग्रामपंचायतींचे उत्पन्न पाहता ग्रामपंचायतींना कोविड किटची गरज असल्याने आपल्या स्थानिक निधीतून त्यांना कोविड किटची उपलब्धता करून देण्यात येत आहे.

कऱ्हाड : विधान परिषदेच्या स्थानिक विकास निधीतून दुसऱ्या टप्प्यातील अखेरचा निधी कोविड लढ्यासाठी दिला आहे. त्या निधीतून कऱ्हाड तालुक्यातील ग्रामपंचायती, रुग्णालये व शैक्षणिक संस्थांना कोविड किटचे वाटप उद्या (गुरूवारी) होणार आहे, अशी माहिती माजी आमदार आनंदराव पाटील यांनी दिली. 

 विजयनगर येथे कार्यक्रम होणार असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले, कोरोनाचा 2020 मार्चमध्ये जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव सुरू झाला. गेले वर्षभर प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनतेचा कोरोनाशी विरोधात लढा सुरू आहे. याला वर्ष पूर्ण होत असताना दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पहिल्या लाटेत समाजातून मदतीचा ओघ मोठय़ा प्रमाणात होता. कोरोना अजूनही वेगाने पसरत असताना मास्क, सॅनिटायझर या बाबींना महत्व आहे. 

गावोगाव कोरोनाचे रूग्ण आढळत असल्याने ग्रामपंचायतींना सतर्कता बाळगावी लागत आहे. ग्रामपंचायतींचे उत्पन्न पाहता ग्रामपंचायतींना कोविड किटची गरज असल्याने आपल्या स्थानिक निधीतून त्यांना कोविड किटची उपलब्धता करून देण्यात येत आहे. तसेच विजयनगर ग्रामपंचायतीतर्फे गावात 15 ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्याचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 19 फेब्रुवारीला वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील ग्रामपंचायतींना कोविड किट प्रातिनिधीक वाटप होते.

उद्या (गुरूवारी) दुपारी साडे तीन वाजता विजयनगर येथील पार्वती मल्टिपर्पज लॉन्समध्ये ग्रामपंचायतींना कोविड किट वाटप होणार आहे. सॅनिटायझर मशिन, मास्क, पी.पी.ई कीट, थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटर आदी साहित्य असणारे किट वाटप करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषद साताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा व पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते होणार आहे.

कृष्णा बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले, प्रांताधिकारी उत्तम दिघे, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूध्द आठल्ये, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील, पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजित पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तहसीलदार अमरदिप वाकडे, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे उपस्थित राहणार आहेत. 

शेवटच्या व्यक्तीपर्यंत निधी गेल्याचे समाधान

कोरोनाच्या लढय़ात गेली वर्षभर प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, फ्रंटलाईन वर्कर्स योगदान देत आहेत. कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू होत असताना मास्क, सॅनिटायझरचा वापर गरजेचा आहे. हे ध्यानात घेऊन आमदार निधीतील शेवटचा निधी ग्रामपंचायतींना कोविड किट वाटपासाठी दिला आहे. या माध्यमातून कोरोनाच्या लढय़ाला पाठबळ मिळेल. तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत आमदार निधीचा वापर करण्याचे ध्येय होते. हा निधी योग्य कारणासाठी खर्ची पडत असल्याचे समाधान वाटत असल्याचे माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांनी सांगितले.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख