उदयनराजेंच्या मागणीवरून पालकमंत्र्यांनी शिवस्मारकास दिले अडीच कोटी - 2.5 crore given by the Guardian Minister on the demand of Udayanraje | Politics Marathi News - Sarkarnama

उदयनराजेंच्या मागणीवरून पालकमंत्र्यांनी शिवस्मारकास दिले अडीच कोटी

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

सातारा शहरासह जिल्ह्याला ऐतिहासिक ओळख आहे. इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा अनेकांना प्रेरणा देत असतात. काही ऐतिहासिक वास्तु काळाबरोबर नामशेष झाल्या तर काही वास्तु आजही अस्तित्वात आहेत. या वास्तुंचे जतन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी मान्य करत सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी दुसऱ्या टप्प्यात तातडीने अडीच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यासोबतच शाहूनगरीतील ऐतिहसिक वास्तुंच्या सुशोभिकरणासाठी जिल्हा नियोजन समितीतून भरीव तरतूद करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे उदयनराजे यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत. 

सातारा शहरासह जिल्ह्याला ऐतिहासिक ओळख आहे. इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा अनेकांना प्रेरणा देत असतात. काही ऐतिहासिक वास्तु काळाबरोबर नामशेष झाल्या तर काही वास्तु आजही अस्तित्वात आहेत. या वास्तुंचे जतन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकास साजेसा पुतळा पोवईनाका येथे आहे. या परिसराचे सुशोभिकरण आणि चबुतऱ्याची उंची वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. 

या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामास सुमारे अडीच कोटी रुपये आवश्यक आहेत. ही तरतुद जिल्हा नियोजन समितीतून तातडीने करण्यात यावी, याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी तथा नियोजन समितीचे सदस्य सचिव शेखर सिंह यांच्याकडे मागणी केली. त्यासाठी उदयनराजेंनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, गणेश भोसले, संग्राम बर्गे, राम हादगे, जितेंद्र खानविलकर उपस्थित होते.

खासदार उदयनराजेंच्या सूचनेची आणि मागणीची तातडीने दखल घेत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नियोजन समितीतून अडीच कोटी रुपयांचा निधी देण्यास मान्य केले. तसेच महाराणी ताराराणी यांच्या समाधी परिसराकरीता आणि सातारा शहरासह जिल्हयातील ऐतिहासिक वास्तुंच्या देखभाल दुरुस्ती आणि सुशोभिकरणासाठी भरीव तरतुद केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे उदयनराजे यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख