सातारा-जावळीतील ग्रामपंचायतींवर शिवेंद्रसिंहराजेंचे निर्विवाद वर्चस्व - Shivendraraje's undisputed dominance over the gram panchayats of Satara-Jawali | Politics Marathi News - Sarkarnama

सातारा-जावळीतील ग्रामपंचायतींवर शिवेंद्रसिंहराजेंचे निर्विवाद वर्चस्व

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 18 जानेवारी 2021

निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार पॅनेल प्रमुख आणि कार्यकर्ते हळूहळू सुरुची या निवासस्थानी जमा होऊ लागले. निकाल जाहीर होताच त्या- त्या गावातील शेकडो कार्यकर्ते गुलालाची उधळण करत शिवेंद्रसिंहराजे यांचा जयजयकार करत सुरुची निवास्थानी दाखल होत होते. 

सातारा : सातारा आणि जावळी तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवादीत सत्ता मिळवली.  काही ग्रामपंचायतीत विरोधी गटाला एकही जागा मिळाली नाही. विजयानंतर शिवेंद्रसिंहराजे गटाच्या विजयी उमेदवारांसह हजारो कार्यकर्त्यांनी सुरूची या निवासस्थानी जावून गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच गावच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू असे आश्वासनही दिले. सातारा तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींची निवडूणुक लागली होती. प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. १३० पैकी 37 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या.

उर्वरित ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाले. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार पॅनेल प्रमुख आणि कार्यकर्ते हळूहळू सुरुची या निवासस्थानी जमा होऊ लागले. निकाल जाहीर होताच त्या- त्या गावातील शेकडो कार्यकर्ते गुलालाची उधळण करत शिवेंद्रसिंहराजे यांचा जयजयकार करत सुरुची निवास्थानी दाखल होत होते. 

 सातारा तालुक्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या शेंद्रे (८-०),कोंडवे (१०-३), नागठाणे (१७-०), कळंबे (९-०), किडगाव (९-०), ठोसेघर (७-०), बोरगाव (११-०), परळी, सासपडे, नुने (४-३), डोळेगांव (५-२), शिवाजीनगर, कुमठे (७-०), वाढे (६-४), राकुसलेवाडी (५-०), सारखळ (५-२), नेले (५-२), पिलाणी (४-३), शिवाजीनगर, शेळकेवाडी, करंडी, परमाळे (४-३), काळोशी (५-२), वळसे, वेणेगाव, अंगापूर, कुसवडे (५-४), वर्ये, लावंघर, आरे, दरे, वनगळ,मापरवाडी, वेचले, नागेवाडी, कण्हेर, आगुंडेवाडी, अहिरेवाडी यासह बहुतांशी सर्वच ग्रामपंचायतींवर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने झेंडा फडकवला आहे. 

जावलीत आमदार गटाचाच झेंडा....
सातारा तालुक्याप्रमाणेच जावली तालुक्यातही सर्वच ग्रामपंचायतींवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने वर्चस्व निर्माण केले. जावली तालुक्यातील ७५ पैकी ३७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ३८ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. निकालात सर्जापूर, सरताळे, कुडाळ, महिगाव, सनपाने, आलेवाडी, दरे बुद्रुक, धोंडेवाडी, करंदोशी, काटवली, हातगेघर, पिंपळी, वहागांव, जरेवाडी, कोलेवाडी आदी ग्रामपंचायतीवर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने बाजी मारली.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहुलेल्या कुडाळ ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या लढतीत शिवेंद्रसिंहराजे यांचे कट्टर समर्थक सौरभ शिंदे यांच्या रयत पॅनेलने सात, विरेंद्र शिंदे यांच्या पॅनेलच्या चार जागा निवडून आल्या. विरोधी महाविकास आघाडीला चार जागा मिळाल्यामुळे या ग्रामपंचायतीवरही शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने सत्ता मिळवली. बामणोली कोयना विभागात आमदार गटाने नऊ पैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध करून आदर्श निर्माण केला आहे.

येथील बामणोली, शेंबडी, मुनवाले, कारगाव, उंबरी, आपटी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. कास, निपाणी, वेळे ढेंन याही ग्रामपंचायतीवर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने वर्चस्व मिळवले आहे.  सुरुची येथे कार्यकत्यांनी दिवसभर  गुलालाची उधळण करत विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवेंद्रसिंहराजे आणि कै. अभयसिंहराजे भोसले यांचा जयघोष करुन सारा परिसर दणाणून सोडला. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे राजवाडा ते शाहपूरी या मार्गावर काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख