मला तुमची लाज वाटतेय : नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांची अशी धुलाई केली की बस्स! - union minister nitin gadkari slams officers for inefficiency | Politics Marathi News - Sarkarnama

मला तुमची लाज वाटतेय : नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांची अशी धुलाई केली की बस्स!

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

दोनशे कोटींची इमारत बांधायला नऊ वर्षे लागली...

नवी दिल्ली : केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे रौद्र रूप पाहायला मिळाले. गडकरी कामचुकार अधिकाऱ्यांवर एवढे संतापले की त्यांनी अतिशय कठोर शब्दांत त्यांची निर्भत्सना केली. सरकारी प्रकल्प कसे विलंबाने कार्यान्वित होतात, याचे जिवंत उदाहरण त्यांना पाहायला मिळाले. त्यातून त्यांनी अक्षरक्षः अधिकाऱ्यांची धुलाई केली. 

रस्त्यांचे काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिकाऱ्यांना हाकलून लावणे हेच माझे काम झाले आहे. मला मंत्र्यांचे अधिकार माहिती आहेत. माझा स्वभाव संवेदनशील आहे. लोकांचे वाईट करण्याचा नाही, पण आता मला वाटत अशा लोकांची धुलाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे काम पूर्ण होताना तीन सरकारे बदलून गेली. मग मी तुमचे का अभिनंदन करू? मला अभिनंदन करायचीही लाज वाटतेय.”

दोनशे कोटी रुपयांचे काम करायला दहा वर्षे लावता तर एक लाख कोटींचे रस्ते बांधायला किती पिढ्या लावाल? असा संतप्त सवाल केला. एवढेच नव्हे तर अशा नालायक अधिकाऱ्यांची धुलाई केली पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला.

गडकरी म्हणाले, “कोणतेही काम पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांचे अभिनंदन करण्याची प्रथा आहे. पण मला संकोच वाटतोय की, तुमचं अभिनंदन कसे करू? कारण २००८ मध्ये निश्चित झाले होत की, अशा पद्धतीची इमारत उभारण्यात येईल. २०११ मध्ये याची निविदा निघाली आणि २०० – २५० कोटींचं हे काम ९ वर्षांनंतर पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी लागलेल्या वेळेत तीन सरकारे आणि आठ अध्यक्ष झाले. त्यानंतर आज हे काम पूर्ण झाले आहे. ज्या “महान” लोकांनी २०११ पासून २०२० पर्यंत हे काम केलेय, त्यांचे फोटो या कार्यालयात लावण्याचा प्रयत्न करा,” असा टोला गडकरींनी अधिकाऱ्यांना लगावला.

“१ लाख ८० हजार कोटी रूपयांच्या निधीतून तयार करण्यात येणारा दिल्ली-मुंबई महामार्ग तीन वर्षात पूर्ण करणार असल्याचे आपण अभिमानाने सांगतो आहोत. इतक्या मोठ्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या कामाला तीन – साडेतीन वर्ष जर लागणार असतील आणि या फक्त २०० कोटींच्या कामासाठी आपण १९ वर्ष लावली, तर हे “अभिनंदन” करण्यासारखं नाही. पण मला याची लाज वाटतेय. जे विकृत विचारांचे अधिकारी आहेत. ज्यांनी निर्णय न घेता समस्या तयार केल्या.

हे सगळे १२ ते १३ वर्षांपासून चिटकून बसले आहेत. जो कुणी नवीन अध्यक्ष येतो, त्यांचे मार्गदर्शक हे लोक बनतात. जे पूर्णपणे नकारात्मक आणि विकृत आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय नाही, पण त्यांची विचारधारा विषकन्येसारखी आहे. अशा विकृत लोकांना मार्गदर्शक म्हणून का स्वीकारले जाते, हे मला कळत नाहीये. मुख्य महाव्यवस्थापक आणि महाव्यवस्थापकांची परंपरा किती नालायक आणि निकम्मी आहे, याचे उदाहरण म्हणजे ही इमारत आहे. हे काम ज्यांनी पाहिलं, त्याचा एक संशोधन पेपर तयार करावा. आपण जे लोक घेतो, लायक नाहीत. या संस्थेचे इतके उत्तम नाव आहे, त्यानंतरही आपण अपयशी ठरलेलो आहोत,” अशी उद्विग्न टीका गडकरी यांनी केली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख