श्रीनिवास पाटलांचे सुरवातीपासूनचे लिड उदयनराजेंना तोडता आले नाही - Udayanraje could not break Srinivas Patil's lead from the start | Politics Marathi News - Sarkarnama

श्रीनिवास पाटलांचे सुरवातीपासूनचे लिड उदयनराजेंना तोडता आले नाही

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

उदयनराजे भोसले यांनी केंद्रात आणि राज्यातील भाजपचे सरकार असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी सत्तेत राहणे फायद्याचे ठरू शकते. हे ओळखून त्यांनी चार महिन्यांत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला.

सातारा : शरद पवारांनी धो पावसात भिजत चुक सुधारण्याची सूचना सातारकर जनतेला केली होती. या चूकीची दुरूस्ती सातारकरांनी गेल्यावर्षी आजच्या दिवशी केली आणि राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांना विजयी केले. तर उदयनराजेंना साताऱ्यातून खासदार म्हणून निवडून आणण्याचे मोदी, शहा आणि फडणवीस या दिग्गज नेत्यांचा स्वप्न भंग झाले. चार महिन्यात पुन्हा भाजपकडून निवडणुक लढताना उदयनराजेंसह त्यांच्या समर्थकांना आपले लिड तीन ते साडे चार लाखांवर जाईल, असे वाटले होते. पण सातारकरांनी त्यांचे मनसुबे धुळीस मिळविले.

24 ऑक्‍टोबर २०१९ रोजी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष साताऱ्याकडे लागले होते. कारण चार महिन्यात उदयनराजेंना पुन्हा खासदार करण्याचे आव्हान भाजपच्या दिग्गज नेत्यांनी स्वीकारले होते. उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपची विभागीय सभा साताऱ्यात झाली होती. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून एकमेव खासदार शरद पवार हे योध्याप्रमाणे लढत देत होते. त्यांनी साताऱ्यात सांगता सभा घेण्याचा निर्णय घेतला. ती सभाच परिवर्तन करून गेली. 

यासाठी उदयनराजेंनी घेतला निर्णय.... 
राष्ट्रवादीतून खासदार होण्याची हॅटट्रीक केलेल्या उदयनराजे भोसले यांनी केंद्रात आणि राज्यातील भाजपचे सरकार असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी सत्तेत राहणे फायद्याचे ठरू शकते. हे ओळखून त्यांनी चार महिन्यांत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. पश्‍चिम महाराष्ट्रात त्यांच्या माध्यमातून राजकारणावर पक्कड निर्माण करण्याचा भाजपचा उद्देश होता.

राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला.... 
या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडे मात्र, उमेदवार नव्हता. उदयनराजेंच्या विरोधात उभे राहण्यासाठी राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांपैकी कोणीही पुढे येत नव्हते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासाठी गुप्तपणे सातारा जिल्ह्यात थांबून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यामुळे राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण असणार यावर सर्व काही अवलंबून होते. शेवटी शरद पवार यांनी आपला जीवलग मित्र श्रीनिवास पाटील यांच्यावरच जबाबदारी सोपवली. त्यांनीही आपल्या मित्राच्या शब्दाखातर साताऱ्यातून उभे राहण्याचा निर्णय घेतला. शेवटी ठरलं उदयनराजेंच्याविरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी अंतिम झाली. 

श्रीनिवास पाटलांची पहिल्यापासून आघाडी... 
मतमोजणी सुरू झाली, त्यावेळी उदयनराजे जलमंदीरात तर श्रीनिवास पाटील कऱ्हाडात होते. मतमोजणीच्या ठिकाणी दोघांचे समर्थकच उपस्थित होते. सुरवातीपासूनच श्रीनिवास पाटील यांनी दोन हजार मतांची आघाडी घेतली होती. ही आघाडी 32 हजार 500 मतांपर्यंत गेली आणि ती शेवटपर्यंत वाढतच गेली. प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणी निर्णय बदलले असे उदयनराजेंचे समर्थक सांगत होते. प्रत्यक्षात उदयनराजेंना शेवटपर्यंत श्रीनिवास पाटील यांनी घेतलेले लिड तोडता आले नाही. शेवटी 87 हजार 717 मतांनी श्रीनिवास पाटील विजयी झाले. श्रीनिवास पाटील यांना सहा लाख 36 हजार 620 मते तर उदयनराजेंना पाच लाख 48 हजार 903 मते मिळाली होती. 

उदयनराजे हे सांगण्यास विसरले.... 
राष्ट्रवादीतून निवडून आल्यानंतर चारच महिन्यात आपण भाजपमध्ये का जातोय, हे सांगण्यास उदयनराजे विसरले. तसेच त्यांच्या समर्थकांतही उदयनराजे गेल्यावेळपेक्षा अधिकच्या मताधिक्‍क्‍याने निवडून येतील, असा अंधविश्‍वास निर्माण झाला होता. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी होती. सातारा व कोरेगाव मतदारसंघातून उदयनराजेंना श्रीनिवास पाटलांपेक्षा जास्त मते दिली. उर्वरित कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, पाटण व वाई तालुक्‍याने श्रीनिवास पाटलांना लाखांच्यावर मते दिली होती. 

पावसातील सभेने घडविले परिवर्तन.... 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात सांगता सभा ठेवली होती. यासभेत त्यांनी धो पावसात भिजत सातारकरांना एक आवाहन केले. मागील निवडणुकीत माझ्याकडून एक चूक झाली आहे. ही चूक तुम्ही या निवडणुकीत सुधारावी, असे सांगितले होते. या भावनिक आव्हानाने आगामी निवडणुकीत साताऱ्यात परिवर्तन घडविले. 

राष्ट्रवादीची एकजूट दिसली..... 
चार महिन्यात निवडुन दिलेला खासदार पक्ष सोडून जातो, ही राष्ट्रवादीच्या आमदारांना लागले होते. मागील लोकसभा निवडणुकीत सर्व आमदारांनी साताऱ्याचा उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. उदयनराजेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला श्री. पवार वगळता राष्ट्रवादीचा एकही नेता उपस्थित राहिला नव्हता. त्यामुळे पवारांच्या मनातही घालमेल होती. तरीही त्यांनी त्यावेळी उदयनराजेंनाच तिकिट दिले होते. पण त्यांची चूक चार महिन्यात त्यांना कळली होती. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांची एकजूट पहायला मिळाली. त्यामुळेच श्रीनिवास पाटील यांचा विजय झाला. 

मैत्रीसाठी श्रीनिवास पाटील मैदानात...
श्रीनिवास पाटील हे सिक्किमचे राज्यपाल पदाचा कार्यकाल संपल्यावर त्यांनी कोणतीही निवडणुक लढणार नसल्याचे सांगितले. पक्ष व संघटनेसाठी काम करणार असल्याचे सांगितले होते. पण लोकसभेच्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादीकडे उदयनराजेंच्या विरोधात टक्कर देणारा उमेदवार नसल्याने शेवटी शरद पवारांच्या मैत्री पोटी त्यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. माझा 80 वर्षाचा मित्र योध्यासारखा लढत असताना मी मागे राहणे योग्य नाही, असे त्यांनी म्हणत केवळ मित्राच्या शब्दापोटी त्यांनी लोकसभेची निवडणुक लढली आणि ते विजयी झाले. 

गादीची प्रतिष्ठा न ठेवल्याचा परिणाम...

उदयनराजे भोसले यांच्या पराभवाबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हणाले, लोकसभेची एकच जागा महाराष्ट्रात होती. स्वाभाविक सगळ्यांचं लक्ष या जागेकडे होते. साताऱ्याच्या गादीबद्दल सर्वांनाच आदर आहे. पण त्या गादीची प्रतिष्ठा न ठेवल्यास काय होते ते दिसून आलं. श्रीनिवास पाटलांसारख्या नेत्याना निवडुन दिल्याबद्दल मी सातारकर जनतेचे आभार मानतो.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख