मेळघाटातून जाणारा रेल्वे मार्ग बदलू देणार नाही : नवनीत राणा  - railway route through melghat will not be changed said navneet rana | Politics Marathi News - Sarkarnama

मेळघाटातून जाणारा रेल्वे मार्ग बदलू देणार नाही : नवनीत राणा 

सुरेंद्र चापोरकर
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

पश्‍चिम विदर्भाची आण- बान- शान असणारी ब्रिटिशकालीन नॅरोगेज रेल्वे ही कष्टकरी, श्रमजीवी, शेतकरी यांची जीवनवाहिनी आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे अनेकांना त्रास भोगावा लागत आहे. यासोबतच मूर्तिजापूर- अचलपूर या मार्गावरील अनेक गावांतील लोकांना आता दळणवळण करताना त्रास होतो आहे.

अमरावती : मेळघाटातून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर अनेकांची वक्रदृष्टी पडली आहे. हा मार्ग परिवर्तित करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा पत्र दिले आहे. पण हा मार्ग बदलल्यास मेळघाटातील आदिवासी मुख्य प्रवाहापासून दूर फेकले जातील. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हा मार्ग बदलू देणार नाही, असे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना आज सभागृहात ठासून सांगितले.  

मेळघाटातून जाणारा रेल्वेमार्ग वळविण्याच्या मुद्यावर सध्या चांगलाच खल सुरू असून आज खासदार नवनीत राणा यांनी हा मुद्दा लोकसभेत उचलला. मेळघाटला रेल्वेच्या नकाशावरून गायब होऊ देणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले. ब्रिटिशकालीन अकोला- अकोट- धूळघाटरेल्वे- डाबका-खंडवा मार्गावर धावणारी रेल्वे ब्रॉडगेज करण्याचे काम तात्पुरते थांबविण्यात आले आहे. परंतु आता सदर रेल्वेचा मार्ग परावर्तित करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पत्र दिले. ज्यामुळे आदिवासींवर अन्याय होऊन ते मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जाऊ शकतात व विकासापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे हा मार्ग कुठल्याच परिस्थितीत बदलू नये व तातडीने ब्रॉडगेज करून या मार्गावरून रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी खासदार नवनीत रवी राणा यांनी आज सभागृहात केली.
 

-->