खासदार पाटील म्हणाले; इकडे काटा करा आणि तिकडे नोटा द्या ! - mp patil said fork here and give notes there | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार पाटील म्हणाले; इकडे काटा करा आणि तिकडे नोटा द्या !

राजकुमार भितकर
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

नांदेड येथे एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खासदार हेमंत पाटील यांची स्तुती करताना खासदार असावा तर हेमंत पाटलांसारखा, असे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, खासदार हेमंत पाटील यांचे लक्ष विकासात्मक कामांकडे आहे.

यवतमाळ : शेतमाल विक्रीतील भानगडी काही केल्या कमी झालेल्या नाहित. माल विक्री केल्यावर काटा केल्यानंतर मग कितीतरी दिवसांनी त्यांना मोबदला दिला जातो. यामध्ये शेतकऱ्यांची चांगलीच ससेहोलपट होते. ही पद्धत आतातरी बदलली पाहिजे. बाजारपेठेतून आज टीव्ही खरेदी केला आणि पैसे तीन दिवसांनंतर दिले तर चालणार का, असा प्रश्‍न उपस्थित करीत शेतकऱ्यांच्या शेतमालाचा एका हाताने काटा करा आणि दुसऱ्या हाताने चुकारे करा, अशी खणखणीत मागणी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभेत केली. ते अधिवेशनादरम्यान कृषी संवर्धन व सरळीकरण विधेयकाचे समर्थन करताना बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, भारत कृषिप्रधान देश आहे. देशात 80 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी दोन एकरांपेक्षा कमी जमीनक्षेत्र धारण केलेले आहेत. या विधेयकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला माल कुणालाही विकण्याचा हक्क प्राप्त होणार आहे. त्यामुळे कृषिमंत्री नरेंद्र तोमर, कैलास चौधरी, रूपारेल यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. यापूर्वी शेतकरी कृषी उत्पन्न बाजार बाजार समिती कायद्याअंतर्गत येत असत. त्यामुळे त्यांना दलाल व अडत्यांमार्फतच आपला शेतमाल विकावा लागत होता. महाराष्ट्रात तर साखर सम्राटांनी ‘झोनबंदी’ केल्याने ऊस उत्पादक बंदिस्त झाले होते. त्यामुळे शेतकरी आपला माल दुसरीकडे विकू शकत नव्हते. काही अडते, मध्यस्थ व दलालच शेतमालाचा भाव ठरवत. 

या विधेयकामुळे शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला माल विकण्याची मुभा मिळाली आहे. बाजारात कांदा आजच्या तारखेला 25 रुपये किलो विकला जात असताना शेतकऱ्यांना केवळ एक रुपया मिळतो. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दलालांच्या जोखडातून मुक्त करणे गरजेचे आहे. या विधेयांतर्गत शेतकऱ्याने बाजारपेठेत माल विकल्यावर त्याचे चुकारे देण्याची मुदत तीन दिवस करण्यात आली आहे. परंतु, आज बाजारपेठेत टीव्ही विकत घेतला आणि पैसे तीन दिवसांनी दिले तर चालेल का, असा प्रश्‍न उपस्थित करून खासदार हेमंत पाटील यांनी ‘इकडे काटा करा आणि तिकडे नोटा द्या’ असे म्हणत शेतकऱ्यांची बाजू उचलून धरली. 

शेतकऱ्यांना नगदी चुकारे दिले तरच देशातील शेतकरी वाचू शकतील, असा भावनिक मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. शेतमालासंदर्भाने उपस्थित केलेला लवाद हा जिल्हाधिकार्‍यांच्या कक्षेत न चालविता तो तहसीलदारांकडे चालविण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

खासदार हेमंत पाटलांसारखा असावा : अशोक चव्हाण
नांदेड येथे एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खासदार हेमंत पाटील यांची स्तुती करताना खासदार असावा तर हेमंत पाटलांसारखा, असे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, खासदार हेमंत पाटील यांचे लक्ष विकासात्मक कामांकडे आहे. त्यांनी परभणीपासून रेल्वे सुरू करून विकासाला चालना दिली आहे.        (Edited By : Atul Mehere) 
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख