मुख्यमंत्री घरात बसून म्हणतात, ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ 

आज महाराष्ट्रात कोरोनाच्या उपचारासाठी १० टक्के खासगी रुग्णालय आरक्षित केले आहेत, ते ५० टक्के करण्यात यावे. खासगी रुग्णालयात एका रुग्णाकडून २ लाख ते १५ लाख रुपये उपचारासाठी आकारले जातात. खासगी रुग्णालयांत चार हजाराचे औषध साडेअकरा हजार रुपयांना विकले जाते. मी स्वतः भरती असताना ते घेतले आहे.
Uddhav Thackeray - Navnit Rana
Uddhav Thackeray - Navnit Rana

नागपूर : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. आधी मरणाऱ्यांची संख्या दर दिवसाला मोजली जात होती, आता दर तासाला मोजावी लागत आहे. राज्य सरकार याच गतीने चालत राहिले तर यापेक्षाही भयावह स्थिती निर्माण होणार आहे. आमचे मुख्यमंत्री आपल्या घरात बसून म्हणतात, ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’, ‘माझा गाव - माझी जबाबदारी’. ‘माझा महाराष्‍ट्र - माझी जबाबदारी’, असं ते का म्हणत नाहीत, असा रोखठोक सवाल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता सभागृहात विचारला आहे. 

मुख्यमंत्री म्हणून आपल्या जबाबदारीपासून ते दूर का पळताहेत. लोकांना हिंमत द्यायची ही वेळ आहे, पण ते स्वतःच कोरोनाला भ्यायलेले दिसत आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशा मागणीही खासदार राणा यांनी केली. आमच्या राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार हे ८० वर्षाचे आहेत. तरीही ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात फिरून कोरोनासंदर्भातील उपचाराच्या व्यवस्थेची पाहणी करत आहेत. लोकांना धीर देत आहेत आणि तरुण मुख्यमंत्री आपल्या घरात खुर्चीवर बसून महाराष्ट्रातील जनतेला ‘कुटुंबाची जबाबदारी’ शिकवत आहेत, हे कितपत योग्य आहे. कोरोनाची भयावहता आम्ही स्वतः अनुभवली आहे. आमच्या घरातील १८ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह होते. आम्ही रुग्णालयांत उपचार घेतलेले आहेत. पीपीई किट घालून डॉक्टर्स, नर्सेस कसे उपचार करतात, त्यातल्या त्यात महिला हे मला माहिती आहे. कारण मी त्यांच्याशी स्वतः बोललेले आहे, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्था आहे त्यापेक्षाही अधिक सुधारण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. 

मार्च महिन्यात जेव्हा कोरोनाचा शिरकाव झाला होता. तेव्हा सभागृहात मास्क घालून आले पाहिजे, हे सांगणारी पहिली सदस्य मी होती, याची आठवण खासदार नवनीत यांनी सभागृहाला करवून दिली. त्यावेळीही अध्यक्ष महोदयांनी काहीही म्हटले नव्हते. म्हणजे हा विषय गांभीर्याने घेतला नव्हता, असा टोला त्यांनी मारला. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती आज भयावह आहे, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. अमरावती जिल्ह्यात १० हजाराच्या वर रुग्ण असल्याचेही त्यांनी नमूद केले. विदर्भात कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नाहीये. चार जिल्हे मिळून केवळ एक टॅंकर दिला जात आहे. असेच सुरू राहिले तर लोक पटापट मरायला लागतील, असा इशारा त्यांनी दिला. 

प्रत्येक जिल्ह्याला दररोज एक टॅंकर ऑक्सिजन द्या

ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या आयनॉक्स या कंपनीला प्रत्येक जिल्ह्यात दररोज एक टॅंकर ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश द्यावे. जेणेकरून जीवन-मरणाची लढाई लढणाऱ्या लोकांना जिंकण्याचे बळ मिळेल आणि मृत्यूदर कमी केला जाऊ शकेल. आज महाराष्ट्रात कोरोनाच्या उपचारासाठी १० टक्के खासगी रुग्णालय आरक्षित केले आहेत, ते ५० टक्के करण्यात यावे. खासगी रुग्णालयात एका रुग्णाकडून २ लाख ते १५ लाख रुपये उपचारासाठी आकारले जातात. खासगी रुग्णालयांत चार हजाराचे औषध साडेअकरा हजार रुपयांना विकले जाते. मी स्वतः भरती असताना ते घेतले आहे, या सर्व प्रकारांवर आरोग्य मंत्र्यांनी नियंत्रण आणावे, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com