महिला शिक्षण दिन देशभर साजरा करावा : छगन भुजबळ - Women's Education Day should be celebrated all over the country NCP Minister Chhagan Bhujbal | Politics Marathi News - Sarkarnama

महिला शिक्षण दिन देशभर साजरा करावा : छगन भुजबळ

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 3 जानेवारी 2021

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी विविध संघटना व व्यक्तींकडून होत आहे, या प्रश्नावर मंत्री भुजबळ म्हणाले, मागणी करण्यास हारकत नाही. त्याला माझा पाठींबा आहे.

सातारा : स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या योगदानाची दखल त्या काळी ब्रिटिश सरकारनेही घेतली होती. त्यामुळे क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती राज्यात महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता संपूर्ण देशभर महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज नायगांव येथील कार्यक्रमात केली.
  
 जय ज्योती..जय क्रांती...च्या जयघोषात आज नायगांव (ता. खंडाळा) येथे क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार मकरंद पाटील, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, वैशाली नेवसे , कविता म्हेत्रे उपस्थित होते. 

मंत्री भुजबळ म्हणाले, महिला शिक्षण दिनानिमित्त राज्य सरकारने ठरविले आहे की प्रत्येक शाळा, महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करावे. तेथे पथनाट्ये, चर्चासत्रे व्हावीत. एकतरी पुस्तक सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्यावरील वाचले पाहिजे, असा कार्यक्रम राबविला जाणार आहे. दहा पंधरा दिवसापूर्वी आम्ही हा निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. पण कोरोनामुळे अडचणीचे झाल्यने आता यापुढे हा उत्सव वर्षभरासाठी राबविला जाणार आहे. तसेच देशभर महिला शिक्षण दिन तीन जानेवारीला साजरा करावा, अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे, असेही त्यांनी सांगितले.   

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी विविध संघटना व व्यक्तींकडून होत आहे, या प्रश्नावर मंत्री भुजबळ म्हणाले, मागणी करण्यास हारकत नाही. त्याला माझा पाठींबा आहे. महात्मा गांधी, यांना आपण भारतरत्न द्या असे म्हणत नाही. महात्मा हे भारतरत्नाच्या पुढे आहेत. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले हेही भारतरत्नाच्या पुढे आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख