मंत्री आठवलेंनी केली शेतात जाऊन नुकसानीची पहाणी - RPI Minister Ramdas Athavale went to the field and inspected the damage | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्री आठवलेंनी केली शेतात जाऊन नुकसानीची पहाणी

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

मंत्री आठवले यांनी आज दुपारी गोखळी येथील गट नंबर 420 मधील सुवर्णा शांताराम जाधव व गट नंबर 543 मधील हणमंत ज्ञानदेव गावडे यांच्या शेतातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कपाशी पिकाची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली.

आसू (ता. फलटण) : परतीच्या पावसाने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाणी साचून पिके कुजून गेली आहेत. शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मी स्वत: केंद्राकडे पाठपुरावा करुन मोठा निधी उपलब्ध करणार आहे. शेतक-यांच्या नुकसानीकडे राज्य शासनाने डोळेझाक केली असून याचा जाबही सरकारला विचारणार आहे, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. श्री. आठवले यांनी शेतात जाऊन कापूस पिकाच्या नुकसानीची पहाणी केली. 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दुपारी फलटण तालुक्‍याच्या पूर्व भागातील गोखळी, खटकेवस्ती येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी केली. बारामती- गोखळी सीमेवर गोखळी ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच रंजना जाधव, अभिजित जगताप, डॉ.गणेश गावडे यांनी मंत्री आठवले यांचे स्वागत केले. 

दरम्यान, मंत्री आठवले यांनी आज दुपारी गोखळी येथील गट नंबर 420 मधील सुवर्णा शांताराम जाधव व गट नंबर 543 मधील हणमंत ज्ञानदेव गावडे यांच्या शेतातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कपाशी पिकाची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. यावेळी भाजपाचे फलटण विधानसभा संपर्कप्रमुख बजरंग गावडे यांनी तालुक्‍यात अतिवृष्टीने ऊस, कापूस, बाजरी, मका आदी पिकांसह पूरामुळे पूलांच्या नुकसानीची माहिती दिली. 

यावेळी पिंटू जगताप, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव विजय येवले, तालुकाध्यक्ष संजय निकाळजे, मुन्ना शेख, सतीश अहिवळे, शहराध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, राजू मारूडा, वाई तालुकाध्यक्ष श्रीकांत निकाळजे, महिला आघाडीच्या विमलताई काकडे, मिनाताई काकडे यांनी मंत्री आठवले यांचे स्वागत केले. 

खटकेवस्ती येथे रामचंद्र गावडे, अक्षय गावडे यांनी स्वागत केले. यावेळी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, तहसिलदार संजय यादव, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक सावंत, तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, मंडलकृषी अधिकारी भरत रणवरे, मंडलधिकारी महेन्द्र देवकाते आणि शेतकरी उपस्थित होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख