'Namo App' should be the banned Says Prithviraj Chavan | Sarkarnama

तर 'नमो ॲप' देखील बंद करावे : पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 30 जून 2020

वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेरील परदेशातील कंपन्यांना पाठवणारे 'नमो अ‍ॅप' देखील बंद केले पाहिजे, ंअसे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

सातारा : भारतीयांची खासगी माहिती धोक्यात असल्याने केंद्र सरकारने चीनशी संबंधित ५९ मोबाईल ॲपवर बंदी घातली आहे. त्याप्रमाणे परस्पर खासगी सेटींग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेरील कंपन्यांना पाठविणारे 'नमो ॲप' देखील बंद केले पाहिजे, अशी अपेक्षा काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. 

कोरोना, इंधन दरवाढ, आर्थिक संकट आणि भारत चीन प्रश्नावरून काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर सडेतोड टिका करत आहेत. केंद्रात आम्ही विरोधी बाकावर असल्याने आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलीच पाहिजेत, हा प्रश्नांची उत्तरे मिळविणे हे विरोधकांचा हक्कच असल्याचे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.

सध्या चीन व भारत संबंध ताणले गेले असून दोन्ही देशांकडून सीमेवर सैन्य तैनात करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर चीनशी संबंधित वस्तूंवर बहिष्कार घालण्याची भुमिका देशभरातून घेतली जात आहे. त्यामुळे जनतेची भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने आज चीनशी संबंधित ५९ मोबाईल ॲपवर बंदी घातली आहे.

यावर आपल्या ट्विटरच्या अकौंटवरून भाष्य करताना काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, १३० कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात आहे. म्हणून चीनशी संबंधित ५९ मोबाईल अ‍ॅपवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेरील परदेशातील कंपन्यांना पाठवणारे 'नमो अ‍ॅप' देखील बंद केले पाहिजे, अशी मागणी श्री. चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. 

श्री. चव्हाण यांच्या ट्विट नेटकऱ्यांच्या समिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असून काहींनी काँग्रेसवरच टिका केली आहे. तर काहींनी चिनी वस्तूंवर बहिस्कारच टाकायला हवा, असे नमुद केले आहे.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख