दिल्लीत सर्व सुरू मग साताऱ्यातच बंद का : उदयनराजेंचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल

उदयनराजे म्हणाले, काहींचे हातावर पोट असून काहींनी कर्ज काढलेले आहे. जरी त्यांना बॅंकांनी मुभा दिली असली तरी लॉकडाउन उठल्यावर या व्यावसायिकांना मागील व्याज भरावे लागणार आहे. त्यामुळे लोक गप्प बसणार नाहीत. लोकांचा संयम सुटला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.
MP Udyanraje Bhosale Meeting With Collector Shekhar singh
MP Udyanraje Bhosale Meeting With Collector Shekhar singh

सातारा : किती दिवस लोकांना घरात थांबवून ठेवणार, असा प्रश्‍न करून दहा ते दोन यावेळेत कोरोना नाही आणि दोननंतर कोरोना बाहेर येतो का. मुळात लॉकडाउन हा विषयच मला पटत नाही. दिल्लीत सर्व काही सुरू आहे. मग साताऱ्यातच बंद का, असा प्रश्न खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित करून साताऱ्यातही सर्व काही लवकरात लवकर सुरू करा, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली.

दरम्यान, कोरोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी केवळ शासनाची नाही तर प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून त्यापध्दतीने वागले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर काही खासगी वैद्यकिय  व्यावसायिकांसोबत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोणत्या उपाय योजनांची गरज आहे, याचे निवेदनही दिले. तासाभराच्या चर्चेनंतर उदयनराजे भोसले बैठकीतून बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

उदयनराजे म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आम्ही खासगी वैद्यकिय व्यावसायिकांच्या मदतीने काही उपाय योजना सुचविल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखणे हे केवळ शासनाची जबाबदारी नाही. तर प्रत्येकाने आपापली जबाबदारी दाखवून त्यापध्दतीने त्याची अंमलबजावणी केली तरच कोरोना नियंत्रणात येईल. दिल्लीत होम क्वारंटाईनची पध्दत राबविली जात आहे.

तेथे सौम्य व लक्षणे विरहित रूग्णांना घरीच थांबून उपचार करण्यास परवानगी दिली जाते. तिच पध्दत सातारा जिल्ह्यात लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार त्यांनी लवकरच हा निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 
लॉकडाउन करून तुम्ही काय मिळविले, असा प्रश्‍न उदयनराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे उपस्थित केला. प्रत्येकाने स्वत: वर बंधने घालून घेतली पाहिजेत.

जिल्हा रूग्णालयासह कोविड सेंटरमध्ये नर्सिंग स्टाफ कमी पडत आहे. त्यांची तातडीने भरती केली जाणार आहे. तसेच मुख्य म्हणजे जिल्हा रूग्णालयात फिजिशियनची गरज आहे.यासाठी शासनाने पाठपुरावा करून थोडे जास्त पैसे देण्याची जाहिरात
दिल्यास निश्‍चित चांगले लोक येतील. साताऱ्यात लवकरात लवकर फिजिशियनची पोस्ट भरण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. 

शपथविधीसाठी मी दिल्ली दौऱ्यावर होतो. तेथे सर्व व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे आपल्याकडे कितीदिवस लॉकडाउन ठेवणार किती दिवस लोकांना घरात बसून राहा, असे सांगणार असा प्रश्‍न उपस्थित करून उदयनराजे म्हणाले, काहींचे हातावर पोट असून काहींनी कर्ज काढलेले आहे. जरी त्यांना बॅंकांनी मुभा दिली असली तरी लॉकडाउन उठल्यावर या व्यावसायिकांना मागील व्याज भरावे लागणार आहे.

त्यामुळे लोक गप्प बसणार नाहीत. लोकांचा संयम सुटला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. अशी परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यात होईल. दहा ते दोन यावेळेत बंद ठेऊन कोरोना होत नाही. दोननंतर कोरोना बाहेर येतो का, असा प्रश्‍न उदयनराजेंनी उपस्थित केला.

मुळात मला लॉकडाउन पटतच नाही. दिल्लीत सर्व काही सुरू आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातही सर्व काही सुरू करा, अशी सूचना उदयनराजेंनी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लॉकडाउन उठविले जाईल, असे सांगितले असल्याचे उदयनराजेंनी सांगितले. 

सीएसआर, खासदार, आमदार फंड वापरा.... 
 डॉक्‍टरांचे सामाजिक दायित्व निधी व मोठ्या कंपन्यांचा सीएसआर फंड कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीचे उपाय योजनांवर खर्च करता येईल. त्यासाठी हा निधी कोरोनासाठी वळविण्यात यावा, अशी सूचना उदयनराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. तसेच खासदार व आमदारांचा निधी ही यासाठी वापरावा. त्यासाठी असलेले नियम शिथिल करून तो निधी वापरण्यास शासनाने परवानगी द्यावी. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com