बंगालमध्ये काँग्रेसची डाव्यांशी दोस्ती; विधानसभा एकत्र लढविण्याची घोषणा - Congress's friendship with the Left in Bengal; Assembly announces to fight together | Politics Marathi News - Sarkarnama

बंगालमध्ये काँग्रेसची डाव्यांशी दोस्ती; विधानसभा एकत्र लढविण्याची घोषणा

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

२९४ जागा असलेल्या विधानसभेच्या २०१६ मधील निवडणुकीत काँग्रेसने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीसोबत लढण्याची घोषणा केली होती. त्यावेळी जागा वाटपात ९० जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या.

नवी दिल्ली : केरळमध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मात्र, जागावाटपाचा तपशील आणि आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा याबाबत बोलण्याचे टाळले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा (माकप)च्या नेतृत्वाखालील डाव्या पक्षांसोबत काँग्रेस निवडणूक लढणार असल्याचे अधीररंजन चौधरी यांनी आज जाहीर केले. सर्वसाधारणपणे आघाडीची घोषणा मित्रपक्षांसमवेत आणि काँग्रेसच्या सरचिटणीस अथवा प्रभारींच्या उपस्थितीत करण्याची काँग्रेसमध्ये परंपरा आहे.

मात्र चौधरी यांनी एकट्यानेच पत्रकार परिषद घेऊन पश्चिम बंगालमधील निवडणुकीसाठी काँग्रेस डाव्या पक्षांबरोबर जाणार असल्याचे जाहीर केले. काँग्रेस नेते जितिन प्रसाद हे बंगालचे प्रभारी असले तरी राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज २३ पत्रलेखक नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. अर्थातच, जितीन प्रसाद यांच्या अनुपस्थितीबाबत काँग्रेसने भाष्य करण्याचे टाळले. 

वाढीव जागेची अपेक्षा...

पश्चिम बंगाल विधानसभेच्या विद्यमान विधानसभेची मुदत २४ मे २०२१ रोजी संपणार आहे.  २९४ जागा असलेल्या विधानसभेच्या २०१६ मधील निवडणुकीत काँग्रेसने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीसोबत लढण्याची घोषणा केली होती. त्यावेळी जागा वाटपात ९० जागा काँग्रेसला मिळाल्या. आगामी निवडणुकीसाठी अद्याप जागा वाटप ठरले नसले तरी काँग्रेसला वाढीव जागा अपेक्षित असल्याचे सूतोवाच अधीररंजन चौधरी यांनी दिले. यासाठी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तृणमूल व भाजपचे आव्हान...
केरळमध्ये काँग्रेस आणि डाव्या आघाडीमधून विस्तव जात नसताना, केरळमध्ये 'कुस्ती' आणि बंगालमध्ये 'दोस्ती'च्या निर्णयावर विचारले असता अधीररंजन चौधरी यांनी यात वावगे काय असा सवाल केला. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख