Bharatratna should be given to Lokshahir Anna Bhau Sathe Says NCP MP Srinivas Patil | Sarkarnama

यासाठी श्रीनिवास पाटलांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी मागणी आहे. अण्णा भाऊ यांनी दिलेल्या साहित्य व सामाजिक योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा. त्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही राज्य शासनातर्फे करावी, अशी विनंती खासदार पाटील यांनी केली आहे. 

कऱ्हाड : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा. त्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे खासदार पाटील यांनी पत्र पाठवून लेखी मागणी केली आहे. पत्रात म्हटले आहे, की तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे यांचे जन्मगाव सातारा जिल्ह्यातील पण, नंतरच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्‍यातील वाटेगांव आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी वेगळे मराठी भाषिक राज्य निर्माण करण्याची मागणी गाण्यातून, पोवाड्यातून, लावण्यांतून केली होती.

 माजी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतिया काहिली.. ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांनी लिहिलेली व गायलेली लावणी गाजली होती. अण्णा भाऊ साठेंनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये 1959 मध्ये लिहिलेल्या फकिरा या कादंबरीला 1961 मध्ये राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे.

त्यांच्या लघुकथांचा संग्रह बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि 27 अ- भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाला आहे. कादंबरी आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील गाणी लिहिली आहेत. कऱ्हाड लोकसभा मतदारसंघाचा खासदार असताना वाटेगाव गाव त्या मतदारसंघात समाविष्ट होते. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यातर्फे प्रयत्न केले होते.

त्यावेळी अण्णा भाऊ साठे यांच्या वाटेगाव येथील स्मारकास मदत केली होती. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी मागणी आहे. अण्णा भाऊ यांनी दिलेल्या साहित्य व सामाजिक योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा. त्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही राज्य शासनातर्फे करावी, अशी विनंती खासदार पाटील यांनी केली आहे. 
 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख