आरोग्य, शेती, कामगारांच्या प्रश्नावर काम करा; ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि ५५ वयापेक्षा अधिक रुग्णांमध्ये कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण पाहता, निवडणुकीच्या काळात जशी आपण बुथनिहाय मतदार यादी बघून काम करतो, तसेच आपापल्या जिल्ह्यातील मतदार याद्या काढा आणि त्यातील ५५ वर्षापुढील वयाच्या नागरिकांची यादी तयार करा, असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
mla ambadas danve news about vc with cm
mla ambadas danve news about vc with cm

औरंगाबादः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, अशा वेळी सर्वसामान्य विशेषतः वृध्दांच्या आरोग्याची काळजी, लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला, धान्याचे होणारे नुकसान व उद्योगांसाठी लागणारे काम या प्रश्नांवर काम करा, अशा सूचना शिवसेनेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिल्या आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ठाकरे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य, शेती आणि कामगार या तीन्ही क्षेत्रांचा आढावा घेत त्यांनी या संबंधीचे प्रश्न सोडवण्यार भर द्या, अशा सूचना केल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.

राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा पन्नास हजारांच्या पुढे गेला आहे, दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला, धान्य बाजारात नेऊन विकण्यात अडचणी आल्यामुळे त्याचे नुकसान होत आहे. तर राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली, पण लाखो कामगार आपापल्या राज्यात आणि गावी परतल्यामुळे मनुष्यबळाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणून काम करत असतांनाच उध्दव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने देखील आरोग्य, शेती आणि कामगार या क्षेत्रात प्राधान्याने काम करण्याच्या सूचना केल्या आहेत.

जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये झालेल्या चर्चे बद्दल माहिती दिली. दानवे म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राज्य पातळीवर अर्थचक्राला गती देण्यासाठी काम करत आहेतच, पण पक्षपातळीवर देखील या कामात लक्ष घालून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचना त्यांनी मला केली आहे. आरोग्य, शेती आणि कामगार असा प्राधान्य क्रम ठरवून त्यानूसार या क्षेत्रातील अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने जे जे करणे शक्य होईल ते करण्यास सांगण्यात आले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि ५५ वयापेक्षा अधिक रुग्णांमध्ये कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण पाहता, निवडणुकीच्या काळात जशी आपण बुथनिहाय मतदार यादी बघून काम करतो, तसेच आपापल्या जिल्ह्यातील मतदार याद्या काढा आणि त्यातील ५५ वर्षापुढील वयाच्या नागरिकांची यादी तयार करा, असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले. यादीनूसार प्रत्यक्ष त्यांना कुठले आजार आहेत, कोरोनाचे लक्षण दिसते का? याची माहिती घेऊन ती तात्काळ जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणाना द्या, जेणेकरून त्यांची वेळवर तपासणी केली जाऊन संभाव्य धोका टाळता येईल.

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांचा भाजीपाला, फळ, धान्य खरेदी करून ते लोकापर्यंत कसे पोहचवता येईल, याचाही विचार केला जावा. जेणेकरून सर्वसामान्य आणि शेतकरी या दोघांचीही अडचण सुटेल. या शिवाय जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती सुरू करण्यात कामागारांची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. बाहेरच्या राज्यातील कामगार मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनमुळे आपापल्या राज्यात गेले आहेत. तेव्हा कारखान्यांसाठी लागणारे मनुष्यबळ उभे करण्यासाठी स्थानिक तरुणांना या संधीची जाणीव करून देत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत.

स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या..

लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची कामे करण्यासाठी लॉकडाऊनमध्येही बाहेर पडावे लागते. लोकांच्या मदतीला धावून जाणे, त्यांच्या अडीअडचणी सोडवणे हे शिवसैनिक म्हणून आपले कर्तव्यच आहे. पण कोरोनाच्या या संकटात काम करतांना स्वताःची आणि इतरांची काळजी घ्या.. शक्य असेल तर घरातूनच काम करा, बाहेर पडावेच लागले तर सुरक्षिततेचे नियम पाळा, असा वडीलकीचा सल्ला देखील उध्दव ठाकरे यांनी दिल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com